डोंबिवली : आरटीओच्या नियमानुसार रिक्षा स्टँडवर दरपत्रक लावणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 02:35 PM2019-02-06T14:35:44+5:302019-02-06T14:36:04+5:30
रिक्षा चालकांनी 2014 पासून शेअरच्या भाड्यामध्ये विशेष दरवाढ केलेली नाही. आरटीओच्या नियमांनुसार जे भाडे आकारायला हवे होते ते आता आकारण्याचा मानस असल्याने तेव्हाच्या नियमांनुसारचे दरपत्रक आता सर्वत्र रिक्षा स्टँडवर आम्ही लावणार असल्याचा पवित्रा लाल बावटा रिक्षा युनियनने घेतला आहे.
डोंबिवली - रिक्षा चालकांनी 2014 पासून शेअरच्या भाड्यामध्ये विशेष दरवाढ केलेली नाही. आरटीओच्या नियमांनुसार जे भाडे आकारायला हवे होते ते आता आकारण्याचा मानस असल्याने तेव्हाच्या नियमांनुसारचे दरपत्रक आता सर्वत्र रिक्षा स्टँडवर आम्ही लावणार असल्याचा पवित्रा लाल बावटा रिक्षा युनियनने घेतला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आरटीओने शब्द न पाळल्याने युनियनने ही भूमिका स्पष्ट केली.
त्या संघटनेचे अध्यक्ष काळू कोमासकर यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या आठवड्यात त्यांची आरटीओ अधिकारी, प्रवासी संघटना आणि वाहतूक नियंत्रण अधिका-यांसमवेत डोंबिवलीत बैठक झाली होती. त्यावेळी आरटीओ अधिका-यांनी कोणत्याही संघटनेने परस्पर फलक लाऊ नयेत, असे आवाहन केले होते. तसेच आगामी दोन दिवसात आरटीओ नियमांनुसार जे भाडे आकारायला हवे ते फलक लावेल, असेही स्पष्ट केले होते. पण त्या बैठकीला आता पाच दिवस होऊन गेले.
तरीही आरटीओकडून कोणताही पुढाकार घेतल्याचे निदर्शनास येत नाही. त्यामुळे आरटीओ अधिका-यांची या विषयासंदर्भात मानसिकता नसल्याचे यावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता लाल बावटा रिक्षा युनयिनच्या माध्यमातून सर्वत्र फलक लावण्यात येतील. त्यामधून नागरिकांना वास्तवता कळेल आणि आता जे भाडे आकारले जात आहे. प्रत्यक्ष नियमांनुसार जे आकारायचे आहे त्यामध्ये असलेली तफावत स्पष्ट होईल. त्यामुळे एकप्रकारे जनजागृतीच होणार असून कोठेही वादविवाद होणार नाहीत. फलकांवरून तातडीने सर्व वस्तूस्थिती समोर निदर्शनास येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आरटीओ अधिका-यांची चुप्पी का आहे? हे मात्र कळत नाही अशी टीकाही त्यांनी केली.
लाल बावटा परस्पर फलक लावण्याच्या पावित्र्यात असल्याबद्दल आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.