Dombivali: सांडपाणी वाहिन्या/चेंबर्स फुटल्याने रोज लाखो लिटर सांडपाणी उघड्या नाल्यात
By अनिकेत घमंडी | Published: April 12, 2024 10:50 AM2024-04-12T10:50:18+5:302024-04-12T10:50:35+5:30
Dombivali News: एमआयडीसी निवासी मधील सांडपाणी वाहिन्या आणि त्यावरील चेंबर्स जागोजागी फुटल्याने त्यातील लाखो लिटर सांडपाणी रोज उघड्या नाल्यात आणि पावसाळी गटारात जात असल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
- अनिकेत घमंडी
डोंबिवली - एमआयडीसी निवासी मधील सांडपाणी वाहिन्या आणि त्यावरील चेंबर्स जागोजागी फुटल्याने त्यातील लाखो लिटर सांडपाणी रोज उघड्या नाल्यात आणि पावसाळी गटारात जात असल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अस्वच्छता, रोगराई, डासांचे वाढते प्रमाण हे या सांडपाणी उघड्यावर वाहण्याचे दुष्परिणाम होत असून एमआयडीसी आणि केडीएमसी यातून काहीच बोध घेतला नसल्याची टीका रहिवासी करत आहेत.
एमआयडीसी निवासी मधील या सांडपाणी वाहिन्या चाळीस वर्षांपेक्षा अधिक जुन्या झाल्याने त्या बदलण्याचे काम एमआयडीसी कडून आता काँक्रिट रस्ते झाल्यावर उशिरा सुरू झाले आहे. परंतु हेही काम अत्यंत कूर्मगतीने सुरू असल्याचे दिसत आहे. सदर या जुन्या वाहिन्या फुटल्यावर सद्या एमआयडीसी कडून कोणतीही दुरुस्ती केली जात नाही. कारण सांगितले जात आहे की आता नवीन सांडपाणी वाहिन्यांचे काम चालू असल्याने त्या जुन्या वाहिन्या काही दिवसातच बाद होणार आहेत. पण हे काम पूर्ण होण्यास कमीतकमी अजून एक वर्षाचा कालावधी लागणार असल्याने तोपर्यंत येथील नागरिकांनी या उघड्यावर बाहेर पडणाऱ्या सांडपाणी वाहिन्यांचे दुष्परिणाम भोगायचे का ? असा सवाल दक्ष नागरिक, रहिवासी संघटनेचे सचिव राजू नलावडे यांनी केला. ते पुढे म्हणाले की, मनपाकडून कीटकनाशक फवारणी आणि धूरिकरण हेही कित्येक दिवसात केले गेले नाही.
निवासी मधील सोमेश्वर पार्क सोसायटी जवळ ( आरएक्स १/१), कावेरी चौक परिसर आणि मिलापनगर तलाव रोडवर इत्यादी अनेक ठिकाणी सांडपाणी वाहिन्या फुटून ते सांडपाणी उघड्या गटारात वाहत असल्याच्या तक्रारी एमआयडीसी कडे करूनही त्याची दखल घेतली जात नाही आहे. त्यात सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी हे सद्या लोकसभा निवडणुकीत प्रचारात मश्गूल असल्याने त्यांना हा महत्त्वाचा प्रश्न दिसत नाही आहे असे वाटते. मतदार जनताही चुपचाप हे सहन करीत आहे. येथील जनतेकडून करोडो रुपयांचा मालमत्ता कर घेणाऱ्या केडीएमसीने तरी यात लक्ष घालून ह्या गंभीर प्रश्नाची दखल अशी मागणी नलावडे यांनी केली.