Dombivali: ज्ञानपीठ पुरस्काराचे मानकरी ज्येष्ठ कवी गुलजारजी यांना डोंबिवलीकर रसिकांनी दिली मानवंदना
By अनिकेत घमंडी | Published: February 19, 2024 02:19 PM2024-02-19T14:19:16+5:302024-02-19T14:19:45+5:30
Gulzar News: डोंबिवली येथील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित अमृतोत्सव या सहा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या श्रृंखलेतील तिसरे पुष्प “गुलजार… द लिजंड” या कार्यक्रमाद्वारे सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात साकारण्यात आले.
- अनिकेत घमंडी
डोंबिवली - येथील टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आयोजित अमृतोत्सव या सहा सांस्कृतिक कार्यक्रमांच्या श्रृंखलेतील तिसरे पुष्प “गुलजार… द लिजंड” या कार्यक्रमाद्वारे सावित्रीबाई फुले नाट्यमंदिरात साकारण्यात आले. स्वरगंधार निर्मित या कार्यक्रमामध्ये सुप्रसिद्ध गायक आलोक काटदरे, डॉ. जय आजगावकर, सोनाली कर्णिक आणि धनश्री देशपांडे ह्या गायक कलाकारांनी आपल्या सुमधूर गायकीने रसिक डोंबिवलीकरांना मंत्रमुग्ध केले. ज्येष्ठ निवेदक आणि गुलजारजींचे स्नेही अंबरीश मिश्र यांनी केलेल्या आभ्यासपुर्ण आणि ओघवत्या शैलीतील खुमासदार निवेदनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. सुप्रसिद्ध संगीत संयोजक सत्यजित प्रभू आणि स्वरगंधारचे संस्थापक श्री मंदार कर्णिक यांनी या कार्यक्रमाचे संगीत संयोजन केले.
आनेवाला पल, वो शाम कुछ अजीब थी, राह पे रेहेते है, ओ माझी रे ही गाणी आलोक काटदरे यांनी आपल्या अनोख्या ढंगात सादर केली. तर डॅा जय आजगावकर यांनी सूरमयी शाम, ए जिंदगी गले लगा ले आणि बिती ना बताई रैना, नाम गूम जायेगा, दिल ढूंडता है या सारखी द्वंद्वगीते गायिका धनश्री देशपांडे आणि सोनाली कर्णिक यांच्यासोबत सादर केली. धनश्री देशपांडे यांनी म्होरा गोरा अंग लेई ले या गीताने कार्यक्रमाची सुरूवात करून तेरे बिना जिया जाये ना, ना जिया लागे ना, यारा सिली सिली या सारख्या सुप्रसिद्ध गाण्यांच्या सादरीकरणाने गुलजारजींच्या काव्याचे विविध पैलू उलगडले. तसेच सोनाली कर्णिक यांनी तुझसे नाराज नही जिंदगी, रोज रोज डाली डाली, मेरा कुछ सामान, दो नैनो मे आंसू, दिल हम हम करे, सिली हवा, आजकल पांव या अजरामर गीतांच्या सादरीकरणाने डोंबिवलीकर रसिकांची मनं जिंकली. इस मोड से जाते है, तेरे बिना जिंदगी से कोई, हूजूर इस कदर है, चपा चपा चरखा चले, कजरा रे या सारख्या द्वंद्वगीतांचे सादरीकरण करण्यात आले.
अमृतोत्सवाचे मंडळाच्या विविध उपक्रमांना गेली २०-२५ वर्षे सहकार्य करणारे कामत , मंडळाच्या गणेशोत्सवा दरम्यान गेली २५ वर्षे विविध संस्कृती आणि मंदिराच्या प्रतिकृती साकारून मंडळाचा गणेशोत्सव हा संपूर्ण ठाणे जिल्ह्यात प्रसिद्ध करणारे सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक श्री संजय धबडे आणि काश्मिर खोऱ्यातील भारतीय शिक्षा समितीच्या शाळांना दोन प्रयोगशाळांकरीता निधीसंकलनाच्या मंडळाच्या अमृतमहोत्सवी वर्षातील महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला आपण काम करत असलेल्या कंपनीच्या सोशल कॅार्पोरेट रिस्पॅान्सिबीलिटी फंडातून भरीव रक्कम मिळवून देण्यासाठी मदत करणारे मंडळाचे माजी कार्यकर्ते डॅा जितेंद्र केळकर ह्या तीन मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्जवलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.
गुलजार यांच्या प्रतिमेची सुरेख रांगोळी नाट्यगृहाच्या प्रवेशद्वारी सुप्रसिद्ध कलाकार उमेश पांचाळ यांनी साकारली होती. अमृतमहोत्सवी वर्षानिमीत्त हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पातील हम चॅरिटेबल ट्रस्ट मार्फत भारतीय शिक्षा समितीच्या शाळांमध्ये प्रयोगशाळेकरीता देण्यास नक्की केलेली संपूर्ण देणगी अमृतोत्सवातील सहा पुष्पांपैकी तिसऱ्या पुष्पापर्यंतच हम चॅरिटेबल ट्रस्टकडे सुपूर्त करण्यात आली असल्याचे मंडळाचे कार्यवाह बल्लाळ केतकर यांनी सांगितले. तसेच पुढील तीन पुष्पांकरीता आणि मंडळाच्या यापुढील शैक्षणिक उपक्रमांकरीता समस्त डोंबिवलीकरांनी यापुढेही सढळ हस्ते सहकार्य करावे असे आवाहनदेखील त्यांनी केले.
अमृतोत्सवातील चौथे पुष्प जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ९ मार्च रोजी मराठी महिला कवयित्री, गीतकार आणि संगीतकार यांच्या गाण्यांवर आधारीत स्वरगीतयात्रा या कार्यक्रमाने साकारण्यात येणार असल्याचेही केतकर यांनी सांगितले.