डोंबिवली अडीच तास फेरीवालामुक्त!
By admin | Published: June 17, 2017 01:35 AM2017-06-17T01:35:56+5:302017-06-17T01:35:56+5:30
रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांमुळे गर्दीच्या वेळी नागरिकांना चालणे अवघड होते. फेरीवाल्यांवर कितीही कारवाई केली तरीही रस्ते
- लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांमुळे गर्दीच्या वेळी नागरिकांना चालणे अवघड होते. फेरीवाल्यांवर कितीही कारवाई केली तरीही रस्ते मोकळे होत नाहीत. त्यावर तोडगा म्हणून सायंकाळी ६ ते ८.३० या अडीच तासात स्थानक परिसरात फेरीवाले बसणार नाहीत, अशी दक्षता घेण्याचा सुवर्णमध्य केडीएमसीचे ‘ग’ प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांनी काढला आहे.
शहरात पूर्वेला रेल्वेस्थानकाबाहेर बसणाऱ्या फेरीवाल्यांमुळे कोंडीत भर पडते. रेल्वेच्या पादचारी पुलांवरून बाहेर पडणाऱ्या नागरिकांना चालणेही कठीण होऊन बसते. फेरीवाल्यांवर ठोस कारवाई करण्यास महापालिका प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेवर आंदोलन छेडण्याची वेळ आली होती. महापौर राजेंद्र देवळकर यांच्यावरही रस्त्यावर उतरण्याची नामुष्की ओढावली होती. तसेच नगरसेवक वामन म्हात्रे यांनीही दर सोमवारी आंदोलन सुरू केले आहे.
दुसरीकडे फेरीवाल्यांवर वारंवार कारवाई करूनही कोणताच परिणाम होत नसल्याने नागरिक हतबल झाले आहेत. फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पूर्णवेळ पथक नेमणे शक्य नसल्याचे स्पष्टीकरण कुमावत यांनी दिले आहे. ते म्हणाले की, ‘प्रामुख्याने स्थानक परिसरात गर्दी होते. त्यासाठी सायंकाळी फेरीवाल्यांना तेथे व्यवसायास बंदी घालावी, अशी मागणी नागरिकांनी केली होती. त्यामुळे सायंकाळी ६ ते ८.३० च्या दरम्यान तेथे गस्तीपथक नेमले आहे. हे पथक फेरीवाले बसणार नाहीत, याची काळजी घेत आहे.’
‘अन्य रस्त्यांवरील फेरीवाल्यांवर कारवाई करा’
पूर्वेला स्थानक परिसराला लागून असलेल्या रामनगर परिसरातील स्वामी विवेकानंद रोडवर फेरीवाल्यांचे बस्तान कायम आहे. त्याचा त्रास नागरिकांना होत आहे.
स्थानकाकडे जाताना डाव्या दिशेला तात्पुरता रिक्षा स्टॅण्ड हलवण्यात आला आहे. त्यामुळे तेथे रिक्षांची रांग तर दुसऱ्या बाजूला फेरीवाले व नागरिकांमुळे मार्ग काढताना वाहनचालकांना त्रास होतो. त्यात अनेकदा केडीएमटीच्या बसही तेथे उभ्या असतात. परिणामी कोंडी आणखीच भर पडते.
केळकर रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामामुळे वृंदावन हॉटेलबाहेरील स्टॅण्ड तात्पुरता मठासमोर हलवला होता. मात्र, पावसाळ््यामुळे रस्त्याचे काम चार महिने बंद आहे. त्यामुळे स्टॅण्ड पूर्वीच्याच जागी सुरू करा. त्यामुळे स्वामी विवेकानंद रोडवरील कोंडी कमी होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
परशुराम कुमावत यांनी केवळ बाजीप्रभू चौक, राथ रोड, एवढेच न बघता उर्सेकरवाडी, स्वामी विवेकानंद रोड आदी ठिकाणच्या फेरीवाल्यांवरही कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.