Dombivali: डोंबिवलीतील रासरंगमध्ये चौथ्या दिवशी गरबा रसिकांची अलोट गर्दी

By मुरलीधर भवार | Published: October 19, 2023 05:31 PM2023-10-19T17:31:22+5:302023-10-19T17:31:56+5:30

Dombivali Navratri 2023: कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून डोंबिवली येथील डी.एन.सी. शाळेच्या मैदानात डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ आयोजित भव्य दांडिया रासरंग - २०२३ उत्सवाला डोंबिवलीकरांसह गरबा रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

Dombivali: Garba lovers throng on fourth day at Rasarang in Dombivali | Dombivali: डोंबिवलीतील रासरंगमध्ये चौथ्या दिवशी गरबा रसिकांची अलोट गर्दी

Dombivali: डोंबिवलीतील रासरंगमध्ये चौथ्या दिवशी गरबा रसिकांची अलोट गर्दी

- मुरलीधर भवार
डोंबिवली - कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून डोंबिवली येथील डी.एन.सी. शाळेच्या मैदानात डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ आयोजित भव्य दांडिया रासरंग - २०२३ उत्सवाला डोंबिवलीकरांसह गरबा रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. घटस्थापनेपासून सुरू झालेल्या या उत्सवाच्या पहिल्या दिवसापासूनच जल्लोष आणि उत्साह पाहायला मिळत आहे. या उत्सवात बुधवारी गरबा रसिकांनी न भूतो अशी गर्दी केली. यावेळी गरबा नृत्याचा अनुभव घेण्यासाठी विशेष मुलांनीही उपस्थिती लावली. तसेच कला क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना यावेळी नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

डी.एन.सी. शाळेच्या मैदानात डॉ. श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि श्री नवदुर्गा युवा मंडळ आयोजित भव्य दांडिया रासरंगचे आयोजन करण्यात आले आहे. नैतिक नागदा आणि त्यांचे सहकलाकार या ठिकाणी उत्कृष्ट असे सादरीकरण करत आहे. घटस्थापनेच्या पहिल्या दिवसापासून सुरु झालेल्या या नवरात्रोत्सवाला गरबा रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. यामुळे उत्तरोत्तर रंगत जाणाऱ्या या उत्सवाला अधिक रंगत चढत आहे. नैतिक नागदा यांच्या सुरांनी आणि ढोलकवादनाने उत्सवाची रंगत वाढविली. पारंपरिक वेशभूषा करून आलेल्या तरुण मित्र मंडळींनी कार्यक्रमाची शोभा अधिक वाढवत मनसोक्त गरबा नृत्याचा आनंद लुटला. आपल्या उत्कृष्ट नृत्याने कार्यक्रमाच्या परीक्षांची मने जिंकणाऱ्या गरबा रसिकांना कार्यक्रमाच्या शेवटी बक्षिसांचेही वाटप करण्यात आले.

सन्मान स्त्री शक्तीचा
उत्सवाच्या पहिल्या दिवशी डोंबिवली गणेश मंदिर संस्थानच्या अध्यक्षा अलका मुतालिक आणि आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत भारताचे नाव उज्वल करणारी बॉक्सिंग चॅम्पियन ईशा भगत या नवदुर्गांचा यावेळी सन्मान करण्यात आला. दुसऱ्या दिवशी डोंबिवली शहराच्या वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नेत्रतज्ज्ञ डॉ.अनघा हेरुर आणि गेल्या पंधरा वर्षापासून शिक्षण सेवेत कार्यरत असलेल्या उन्नती पतंगराव यांना तर तिसऱ्या दिवशी यशस्वी उद्योजिका विदुला आमडेकर आणि भारती पालकर यांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर, चौथ्या दिवशी कलाक्षेत्रात आपले उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यात संगीत क्षेत्रात आपल्या गायनाने वेगळी ओळख निर्माण केलेल्या मृदुला दाढे जोशी आणि कथक नृत्य विशारद ज्योती शिधये यांना नवदुर्गा पुरस्कार देण्यात आला.

रासरंग - २०२३ ला लाभली विशेष उपस्थिती
या उत्सवाला तरुण मित्र मंडळींसह, ज्येष्ठ नागरिकांनी नैतिक नागदा यांच्या स्वरांवर आणि त्यांच्या सहकारी कलावंतांनी सादर केलेल्या वाद्यवृदांच्या तालावर गरबा नृत्याचा आनंद घेतला. यावेळी डोंबिवली येथील संतोष इन्स्टिट्यूट स्वमग्न मुलांची शाळा येथून आलेल्या काही विशेष मुलांनीही गरबा नृत्याचा आनंद घेतला. यावेळी या साऱ्यांनी गाण्यांच्या तालावर ठेका धरत सुरात सूर मिसळला, आणि रासरंग कार्यक्रमाला विशेष रंग लाभला. विशेष मुलांनी या रासरंगाचा मनमुराद आनंद घेतला. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुलांशी संवाद साधला.

Web Title: Dombivali: Garba lovers throng on fourth day at Rasarang in Dombivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.