डोंबिवली : आधी रिक्षा स्टँड द्या मगच नव्या रिक्षा रस्त्यावर आणा, रिक्षा चालक-मालक युनियनचा पवित्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2018 07:02 PM2018-02-14T19:02:30+5:302018-02-14T19:05:58+5:30
शहरात गल्लोगल्ली रिक्षा उभ्या असून किती स्टँड आहेत हेच समजत नाही. अशी भयंकर स्थिती असतांनाही कल्याण आरटीओ अधिकारी नव्या रिक्षा परमिटला परवानगी का देतात
डोंबिवली: शहरात गल्लोगल्ली रिक्षा उभ्या असून किती स्टँड आहेत हेच समजत नाही. अशी भयंकर स्थिती असतांनाही कल्याण आरटीओ अधिकारी नव्या रिक्षा परमिटला परवानगी का देतात. आधी त्या विभागाच्या अधिका-यांनी डोंबिवलीत यावे, वस्तूस्थितीचा अभ्यास करावा, स्टँडची सोय करावी आणि त्यानंतरच नवे इरादापत्र द्यावे. अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल अशी भूमिका पश्चिमेकडील रिक्षा चालक मालक युनियनने घेतली आहे.
युनियनचे कार्याध्यक्ष अंकुश म्हात्रे यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, या शहरामध्ये आरटीओ अधिकारी कधी बघितलेही नाहीत. त्यांना येथे बसण्यासाठी आम्ही सर्व युनियन एकत्र आलो होतो, ट्रॅफिक गार्डनमध्ये आरटीओ अधिका-यांना ठाण मांडावे असे आवाहन केले होते, त्याचे पुढे काय झाले हे माहित नाही. असे एक ना अनेक प्रस्ताव आमच्यासह अन्य युनयिनने दिले होते, पण ती सर्व पत्र वेळोवेळी बासनात गुंडाळली गेली का? असा सवालही त्यांनी केला.
आता जो मागेल त्याला इरादा पत्र या तत्वावर परमिट देण्यात येत आहेत, द्यायला हरकत नाही, पण शहराची वाहन क्षमता संपलेली आहे. त्याचे काय? स्थानक परिसरात सकाळ संध्याकाळ सोडाच कधीही कोंडीच असते. नागरिकांसह रिक्षा चालकांनाही या कोंडीतून मार्ग कसा काढावा हा प्रश्न आहे. असे असतांना आणखी वाहने कशाला आणायची? आणायची असली तरी नव्यांसह जुन्या वाहनांसाठी सुसज्ज रिक्षा स्टँड हवा. रिक्षा चालकांना स्वच्छतागृह, आरामाची जागा हवी. या मुलभूत सुविधा कोण देणार? कल्याण-डोंबिवली महापालिका त्याकडे कानाडोळा करते, वाहतूक विभाग हात वर करतो, मग इराद्यासाठी हजारो रुपये, रिक्षेसाठी लाखो रुपये खर्चून हाती काय पडणार असा सवाल म्हात्रे यांनी केला. जे इरादापत्र घेत आहेत त्या नागरिकांनीही भविष्यातील अडथळयांचा विचार करावा, आधी सुविधा मिळवाव्यात आणि वाहने घ्यावीत. अन्यथा मोठा पेच निर्माण होणार असून त्यावेळी सर्व शासकीय यंत्रणा केवळ बघ्याची भूमिका घेतील असेही ते म्हणाले.
त्यासंदर्भात गुरुवारी संध्याकाळी रिक्षा चालक-मालकांची महत्वाची बैठक पश्चिमेला मच्छीमार्केटलगत होणार आहे. नव्या इरादापत्रांना विरोध नसून आरटीओ अधिका-यांच्या दुटप्पी भूमिकेसाठी ठोस पावले घेण्यासंदर्भात चर्चा होणार आहे. त्या बैठकीतील ठराव, नीवेदन कल्याण,ठाणे आरटीओ आणि परिवहन मंत्र्यांना देणार असल्याचे म्हात्रे म्हणाले.
* या आधीही जून महिन्यात भाजपाप्रणित रिक्षा युनियनचे पदाधिकारी दत्ता माळेकर यांनी इरादापत्रांसंदर्भात तीव्र आक्षेप घेतले होते. कल्याणच्या रिक्षा युनयिनचे पदाधिकारी नाना पेणकर यांनीही आक्षेप घेत पत्र दिली आहेत. त्याची सखोल चौकशी व्हावी. तसेच सातत्याने रिक्षा युनियन यासंदर्भात आवाज उठवत असूनही त्याकडे कानाडोळा का केला जात आहे असा सवाल रिक्षा चालक मालक युनियनच्या पदाधिका-यांनी केला.