इंधनबचतीचे महत्त्व जनमनात रुजवण्यासाठी डोंबिवली ते कोल्हापूर सायकल सफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 11:04 PM2020-12-31T23:04:43+5:302020-12-31T23:04:52+5:30
धर्मेश ठक्कर, डॉ. योगेश चौघुले, श्रीराज अय्यर अशी या तिघा सायकलस्वारांची नावे आहेत.
अनिकेत घमंडी
ठाणे : सुदृढ, उत्तम आरोग्य तसेच इंधनबचतीचे महत्त्व जनमनात रुजवण्यासाठी डोंबिवली सायकल क्लबचे तिघे सदस्य मागील वर्षापासून नववर्षाच्या निमित्ताने डोंबिवली ते कोल्हापूर सायकल प्रवास करत आहेत. यंदाही ते सोमवारी श्री गणेश मंदिर येथून सायकलवर स्वार झाले आहेत. शुक्रवारी १ जानेवारीला ते कोल्हापूरला अंबाबाईचे दर्शन घेऊन नवीन वर्षाची सुरुवात करणार आहेत.
धर्मेश ठक्कर, डॉ. योगेश चौघुले, श्रीराज अय्यर अशी या तिघा सायकलस्वारांची नावे आहेत. डोंबिवली सायकल क्लबतर्फे ते दररोज तर, रविवारी लांबवर सायकल सफर करतात. कोरोनाच्या लॉकडाऊनकाळातही पहिले तीन महिने त्यांच्या सायकलिंगला ब्रेक लागला. परंतु, नंतर टप्प्याटप्प्याने त्यांनी सायकलिंग सुरू केले.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी तिघांनीच कोल्हापूरपर्यंत सायकल प्रवास करण्याचे ठरवले. सोमवारी त्यांनी डोंबिवली ते पुणे गाठले. मंगळवारी सातारा, तिसऱ्या दिवशी नारसोबावाडी करून चौथ्या दिवशी गुरुवारी ते कोल्हापूरला पोहोचणार आहेत. तिथून १ जानेवारीला आई अंबाबाईचे दर्शन घेऊन परत सायकलिंग करत डोंबिवली गाठणार आहेत.
सध्या थंडीचा चांगलाच कडाका आहे. या वातावरणाचा फायदा घेत दररोज १५५ किमीचा प्रवास करणे शक्य होत आहे. अशा पद्धतीने चार दिवसांत एकूण ४५६ किलोमीटरचा प्रवास आम्ही करणार असल्याचे ते म्हणाले. परतीचा प्रवासही अशाच पद्धतीने होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या उपक्रमाचे डाेंबिवलीतील नागरिकांनी स्वागतच केले असून संदेशाचे आचरण करावे अशी अपेक्षा व्यक्त हाेत आहे.