इतकेच मला जाताना सरणावर कळले होते..., सुरेश भट यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला गझल कार्यक्रम
By अनिकेत घमंडी | Published: April 15, 2024 12:42 PM2024-04-15T12:42:48+5:302024-04-15T12:43:17+5:30
Dombivali News: इतकेच मला जाताना सरणावर कळले होते.... जगण्याने छळले होते या सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त पूर्वसंध्येला डोंबिवली येथे 'गझलभान' हा सुंदर गझल मैफलीचा कार्यक्रम झाला. गणेश मनोहर कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आणि संयोजनातून हा कार्यक्रम सादर झाला.
- अनिकेत घमंडी
डोंबिवली - इतकेच मला जाताना सरणावर कळले होते.... जगण्याने छळले होते या सुरेश भट यांच्या जयंतीनिमित्त पूर्वसंध्येला डोंबिवली येथे 'गझलभान' हा सुंदर गझल मैफलीचा कार्यक्रम झाला. गणेश मनोहर कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून आणि संयोजनातून हा कार्यक्रम सादर झाला. चंद्रशेखर सानेकर यांच्या कविता, गझल यांच्या संयुक्त सूत्रसंचालनाने कार्यक्रम शानदार झाला.
सारंग पंपटवार, स्वप्नील शेवडे, रत्नमाला शिंदे,कैलास गांधी आणि डोंबिवलीतील चित्रकार-गझलकार गोविंद नाईक यांच्या सहभागाने कार्यक्रम खरच खूप बहारदार झाला. गझल ही तशी आपल्या आवाक्या बाहेरची गोष्ट! पण गझल मैफिलीत बसल्यावर गझलेच्या एका एका शेरावर जेव्हा वाह..क्या बात! मुकर्रर!!बहोत अच्छे!वाह..!!अशी रसिकांची प्रतिक्रिया ऐकतो तेव्हा आपणही त्यात कधी सामील होऊन जातो कळतच नाही. रदिफ,काफिया, अलामत, वृत्त, मतला,शेर,मुरद्दफ,गैरमुरद्दफ अशा अनेक तांत्रिक गोष्टींतून गझलेत जेव्हा गझलीयत आलेली असते तेव्हा ती गझल ऐकणाऱ्या प्रत्येकाची झालेली असते. हे गझल मैफलीत गेल्यावरच कळते.
त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एक गोष्ट जाणवली ती म्हणजे गझल लिहीताना खूप तांत्रिक गोष्टी शिकाव्या लागतात. सहज ती प्राप्त होत नाही. गझल लिहीणारा खूप अनुभवी कवी असायला हवा किंवा जीवनाचा मोठा अनुभव गाठीशी असायला हवा अशी माझी समजूत होती पण या कार्यक्रमात सारंग,स्वप्नील,रत्नमाला या खूपच तरूण मुलांनी गझला सादर केल्या ते पाहून माझा समज गळून पडला. गझल आता तरूण कवींची आवड बनली आहे हे पाहून भट साहेबांनी लावलेले छोटेसे झाड आता वृक्ष बनत चालले आहे हे मात्र नक्की झाले आहे.
असे कार्यक्रम वरचेवर व्हायला हवेत आणि मोठमोठ्या गझलकारां सोबत तरूण गझलकारांनाही स्टेज शेअर करण्याची संधी मिळायला हवी.त्यामुळे भविष्यात मराठी साहित्य क्षेत्रात अनेक कवी-गझलकार नावा रूपाला येतील.