Dombivali: इतर कला जशा शिकवता येतात तशी कविता शिकविता येत नाही - कवी किरण येले
By अनिकेत घमंडी | Published: April 24, 2023 12:24 PM2023-04-24T12:24:55+5:302023-04-24T12:25:40+5:30
Kiran Yele: इतर कला जशा शिकवता येतात तशी कविता शिकविता येत नाही त्यासाठी मनाची संवेदनशील मशागत व्हावी लागते, असे मत कविवर्य किरण येले यांनी व्यक्त।केले.
- अनिकेत घमंडी
डोंबिवली: कवी हा संवेदनाशील असतो, ती संवेदनशीलता जपायला हवी. कवी हा एका दिवसांमध्ये घडत नाही त्याची मानसिकता, संवेदनशीलता घडवणारे अनेक प्रसंग येऊन गेलेले असतात, इतर कला जशा शिकवता येतात तशी कविता शिकविता येत नाही त्यासाठी मनाची संवेदनशील मशागत व्हावी लागते, असे मत कविवर्य किरण येले यांनी व्यक्त।केले. डोंबिवली पूर्व मधील भगतसिंग रस्त्यावरील पै फ्रेंड्स लायब्ररीच्या शाखेत काव्यरसिक मंडळ,डोंबिवलीच्या कविता व काव्यविषयक साहित्याला' वाहिलेल्या द. भा.धामणस्कर वाचनालयाचे उद्घाटन रविवारी प्रख्यात कवी किरण येले ह्यांच्या हस्ते करण्यात आले.
आजचा वाचक, आजचा भिडस्त लेखक किंवा एकंदरीतच आजचा समाज अशा अनेक विषयांवर त्यांनी भाष्य केले. त्याचबरोबर कवींनी वेगवेगळ्या विषयावरचे वाचन केले पाहिजे. येले यांची अशी विचारिक जडणघडण काव्यरसिक मंडळात झाल्याचे ते म्हणाले. काव्यरसिक मंडळासाठी ही आणखी एक स्वप्नपूर्ती म्हणजेच त्या फ्रेंड्स लायब्ररीमध्ये मंडळात उपलब्ध असणाऱ्या कवितांच्या पुस्तकांचा उपलब्ध असलेला विभाग म्हणजेच धामणस्कर वाचनालय. ह्या वाचनालयाची संकल्पना काव्यरसिक मंडळाचे डॉ.प्रल्हाद देशपांडे ह्यांची आहे. काव्यरसिक मंडळाच्या विद्यमान अध्यक्ष वैदेही जोशी ह्यानी या वाचनालयाची थोडक्यात माहिती सांगितली. काव्यरसिक मंडळातर्फे दरवर्षी काव्य पुरस्कार जाहीर केले जातात. त्यावेळेस स्पर्धेसाठी आलेले काव्यसंग्रह, मंडळातील सदस्यांचे प्रकाशित साहित्य व इतर अनेक पुस्तके मंडळाकडे बरेच वर्षे जमली होती ती वाचकांपर्यंत पोचावी ही मंडळाची इच्छा पूर्ण होते आहे,ती।पूर्ण।झल्याचे सांगण्यात आले. मंडळाचे सदस्य महेश देशपांडे यांनी कविवर्य येले यांचा परिचय करून दिला.
धामणस्कर ह्यांच्या या पुढचं जीवन..ही पुस्तकविषयक कविता अध्यक्षा वैदेही जोशी ह्यांनी तर मंडळाचे सदस्य प्रवीण दामले यांनी येले यांची कविता सादर केली. कवी मुकुंदराव देशपांडे यांची यंत्र या माध्यमातून कवी आणि श्रोते या विषयावरची कविता मृणाल केळकर,मंडळाचे सदस्य कै व. शं. खानवेलकर ह्यांची कविता स्वाती भाटये तसेच अजित महाडकर ह्यानी 'पुस्तकांचे मनोगत' ही कविता सादर केली. मंडळाचे सल्लागार जयंत कुळकर्णी ह्यांनी पुस्तके व वाचनालय विषयक काही इंग्रजी लेखकांची, लेखनाची उदाहरणे तर काही उर्दू शेर ऐकवले. सूत्रसंचालन मेघना पाटील व सानिका गोडसे ह्यांनी केले. सम्राज्ञी उटगीकर ह्यांनी आभार मानले आणि पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
त्या वाचनालयात वाचकांसाठी पुस्तके उपलब्ध होण्यासाठी काही तांत्रिक गोष्टीची पूर्तता होण्यास एक महिन्याचा अवधी लागेल. त्यानंतर आता ह्या वाचनालयाच्या रूपाने हा कवी मनाचा कट्टा वाचकांसाठी सदैव खुला होईल असेही यावेळी जाहीर करण्यात आले.