डोंबिवली लोहमार्ग पोलिसांची उत्तम कामगिरी, 1.36 लाखांचे दागिने महिलेला केले परत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 01:19 PM2019-04-18T13:19:48+5:302019-04-18T14:41:57+5:30
मध्य रेल्वे मार्गावरील विद्याविहार ते कोपर स्थानकादरम्यान प्रवास करताना एका महिलेची 1 लाख 36 हजार रुपयांचे दागिने असलेली बॅग गहाळ झाली होती.
डोंबिवली - मध्य रेल्वे मार्गावरील विद्याविहार ते कोपर स्थानकादरम्यान प्रवास करताना एका महिलेची 1 लाख 36 हजार रुपयांचे दागिने असलेली बॅग गहाळ झाली होती. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी अवघ्या तासाभरात गहाळ झालेली बॅग महिलेला परत केल्याची घटना समोर आली आहे. ही उत्तम कामगिरी डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे हवालदार (बक्कल नं. 1857) जावळे, पोलीस नाईक (बक्कल नं. 890) ढाणे आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या महिला गायकवाड यांनी केली आहे.
विद्याविहार परिसरात राहणाऱ्या श्वेता प्रकाश राजे या बुधवारी (17 एप्रिल) दुपारी 12:45 च्या सुमारास कोपर येथे जाण्यासाठी विद्याविहार स्थानकातून टिटवाळा या लोकलमध्ये बसल्या होत्या. श्वेता प्रकाश राजे या त्यांच्या मुलासोबत प्रवास करत होत्या. लहान मुलाला घेऊन लोकलने प्रवास करताना कोपर स्थानकात त्या उतरल्या. मात्र लोकलमधून उतरताना घाई गडबडीत त्या दागिने असलेली बॅग लोकलमध्येच विसरल्या. त्या बॅगेत 1 लाख 36 हजार रुपयांचे दागिने होते. बॅगेची आठवण येईपर्यंत लोकल सुसाट निघून गेली होती. या घटनेनंतर श्वेता राजे यांनी तात्काळ डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाणे गाठले आणि याबाबत पोलिसांना माहिती दिली.
डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार जावळे, पोलीस नाईक ढाणे आणि महाराष्ट्र सुरक्षा दलाच्या गायकवाड यांनी गहाळ झालेल्या बॅगेचा शोध सुरू केला. लगेचच टिटवाळा स्थानकाच्या स्टेशन मास्तरांशी संपर्क साधण्यात आला. दरम्यान, सदर लोकल पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाण्यास निघाली होती. लोकल डोंबिवली स्थानकात येताच महिला डब्यात विसरलेली दागिन्यांची बॅग पोलिसांनी ताब्यात घेतली. त्या बॅगेबाबात शहानिशा करून दागिन्यांसह बॅग आता महिला प्रवासी श्वेता राजे यांना परत करण्यात आली आहे. गहाळ झालेली बॅग परत मिळाल्याने श्वेता राजे यांनी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले आहेत. डोंबिवली लोहमार्ग पोलिसांनी केलेल्या या उत्तम कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे.