Dombivali: बिबट्याची कातडी बाळगणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2023 21:57 IST2023-04-11T21:57:14+5:302023-04-11T21:57:38+5:30
Crime News: -बिबट्या प्राण्याच्या कातड्याची विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या जयंतीलाल साळी व दिनेश जावरे या दोघांना रामनगर पोलिसांनी अटक केली.

Dombivali: बिबट्याची कातडी बाळगणाऱ्या दोघांना पोलीस कोठडी
डोंबिवली -बिबट्या प्राण्याच्या कातड्याची विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगणाऱ्या जयंतीलाल साळी (४५, रा. ता. धडगाव, जि. नंदुरबार) व दिनेश जावरे (४२, रा. ता. साक्री, जि. धुळे) या दोघांना रामनगर पोलिसांनी अटक केली. या दोघांकडून पाच लाख रुपये किमतीचे बिबट्याचे कातडे पोलिसांनी हस्तगत केले. अटक करण्यात आलेल्या दोघांना कल्याण न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
पूर्वेतील ९० फुट रस्त्याजवळ सोमवारी रात्री दहाच्या सुमारास दोन इसम बिबट्या प्राण्याचे कातडे विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वाय. पी. सानप यांच्यासह त्यांच्या पथकातील पोलीस हवालदार विशाल वाघ, हृषीकेश भालेराव, संजय पाटील व अन्य पोलिसांनी याठिकाणी सापळा रचला. रात्री ८ च्या सुमारास म्हसोबा चौक या दिशेने आलेल्या एका रिक्षातून उतरलेले दोन इसम कोणाची तरी वाट पाहत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. साळी व जावरे यांच्याकडे पोलिसांनी विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दोघांच्या घेतलेल्या झडतीत एका प्लास्टिकच्या गोणीमध्ये एक बिबट्या प्राण्याचे कातडे गुंडाळून ठेवल्याचे पोलिसांना आढळले. याप्रकरणी रामनगर पोलिसानी अटक केलेल्या दोघांना मंगळवारी कल्याण न्यायालयात हजर केले असता नायालायाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.