पाण्याचा निचरा न झाल्याने डोंबिवली जलमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2019 12:00 AM2019-08-04T00:00:17+5:302019-08-04T00:00:28+5:30
आयुक्तांनी ठिकठिकाणी केली पाहणी; पश्चिमेतील ‘ह’ प्रभाग क्षेत्र कार्यालयाला लागली गळती
डोंबिवली : शहरात पहाटेपासून पडलेल्या धुवाधार पावसाने शनिवारी नागरिकांची दाणादाण उडवली. पूर्वेतील रेल्वेस्थानक परिसर, नांदिवली, पंचायत विहीर येथे पाणी साचले. तर, पश्चिमेतील राजूनगर, गरिबाचावाडा, मोठागाव आदी परिसरांत दुपारनंतर खाडीच्या भरतीचे पाणी जमा झाल्याने रहिवासी भयभीत झाले. नांदिवली, भोपर, संदप, देसलेपाडा, सागाव, सोनारपाडा आदी भागांत आयुक्त गोविंद बोडके, अतिक्रमण नियंत्रण विभागाचे उपायुक्त सुनील जोशी व अन्य अधिकाऱ्यांनी पाहणी करत आपत्कालीन विभागाला कार्यवाहीचे आदेश दिले.
आयुक्तांनी पश्चिमेतील खाडीकिनाºयाची पाहणी केली, तेव्हा पाण्याची पातळी नियंत्रणात होती. परंतु, दुपारनंतर मात्र तेथे पाणी भरले. नांदिवली येथील श्री स्वामी समर्थ मठासमोर तुंबलेले पाणी पाहून आयुक्तांनी त्याचा निचरा करण्याचे आदेश आपत्कालीन विभागाला दिले. त्यानुसार, आपत्कालीन पथकातील कर्मचाऱ्यांनी मठानजीक दोन इमारतींच्या भिंती तोडून पाण्याला वाट करून दिली. यावेळी माजी सरपंच रवी म्हात्रे उपस्थित होेते. त्याचबरोबर भोपर व संदप भागांत आयुक्तांनी पाहणी केली. संदपमध्ये नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्याने तो पाण्याखाली गेला. त्यामुळे काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. या पाहणीदरम्यान अमर माळी उपस्थित होते.
केडीएमसीच्या ‘ह’ प्रभाग क्षेत्र कार्यालयाच्या इमारतीला पाण्याची गळती लागली आहे. सभापती वृषाली जोशी यांच्या दालनात प्रचंड पाणी ठिबकत आहे. तसेच भिंती, खिडक्यांमधून पाणी गळत आहे. त्यामुळे कार्पेट व कागदपत्रेही भिजल्याचे त्यांनी दाखवले. सतत पाणी झिरपत असल्यामुळे दालनात ओलाव्यामुळे सगळीकडे बुरशी पकडली आहे. अशा ओलाव्यात आणि दुर्गंधीमध्ये बसायचे कसे, असा सवाल करत त्यांनी प्रशासनाच्या निषेधार्थ दालनात चक्क छत्री उघडून खुर्चीत ठाण मांडले. नागरिक आपल्या समस्या, गाºहाणे मांडण्यासाठी प्रभाग समिती कार्यालयात येतात. परंतु, अशा गैरसोयीच्या ठिकाणी बसून नागरिकांचे प्रश्न कसे सोडवायचे, असा सवाल त्यांनी केला. तर, ही स्थिती आजची नाही. वर्षानुवर्षे अशीच परिस्थिती असतानाही प्रशासन त्याकडे कानाडोळा का करत आहे? इमारतीची वेळच्या वेळी डागडुजी का करत नाही, असा सवाल माजी नगरसेवक रणजित जोशी यांनी केला.
दरम्यान, सकाळपासूनच रेल्वेस्थानक परिसरात सर्वत्र पाणी जमा झाले होते. डॉ. राथ रोड, पाटकर रस्ता येथे पाणीचपाणी झाल्याने आपत्कालीन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी गेले होते. कोपर येथेही नाला भरून वाहत होता. तेथे महापौर विनीता राणे यांनी पाहणी केली. नागरिकांनी गरज असल्यासच बाहेर पडावे, असे आवाहन प्रभाग अधिकारी दीपक शिंदे यांनी केले.
सोसायट्यांमध्ये शिरले साप
म्हात्रेनगर येथे रेल्वेहद्दीतून तीन साप सोसायट्यांमध्ये आल्याने रहिवासी भयभीत झाले. नगरसेवक मुकुंद पेडणेकर यांनी तातडीने रेल्वे अधिकाºयांची भेट घेतली. यावेळी डोंबिवली स्थानक प्रबंधकांनी पेडणेकर यांच्या अर्जावरच सोसायटीच्या रहिवाशांनी कचरा रेल्वे हद्दीत टाकणे बंद करावे, असे आवाहन करणारा शेरा दिल्याने पेडणेकर संतापले. ते म्हणाले की, रेल्वे हद्दीतून साप येतात, त्यावर उपाययोजना करायची सोडून असा शेरा देणे म्हणजे नागरिकांची थट्टा करणे झाले. यासंदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाºयांकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पंचायत विहीर परिसरात पाणी
पंचायत विहीर परिसराला लागून असलेल्या रेल्वेच्या सुरक्षा दलाच्या बटालियनच्या जागेची उर्वरित सुरक्षा भिंत नुकतीच कोसळली आहे. त्यामुळे तेथील पाण्याचा प्रवाह रस्त्यावर येत आहे. दुपारी १२ च्या सुमारास झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी आले होते. त्यामुळे तेथे पडलेले खड्डे दिसत नसल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली. शिवाय, वाहतुकीचा वेगही मंदावला.