डोंबिवलीत मायलेकाला डेंग्यू
By admin | Published: September 23, 2016 03:06 AM2016-09-23T03:06:45+5:302016-09-23T03:06:45+5:30
कल्याण शहरात एकाच कुटुंबातील तिघांना, तर डोंबिवलीत सहा जणांना डेंग्यूची लागण झाल्याची घटना ताजी असतानाच येथील टिळकनगरमधील सुयोग सभागृहाच्या
डोंबिवली : कल्याण शहरात एकाच कुटुंबातील तिघांना, तर डोंबिवलीत सहा जणांना डेंग्यूची लागण झाल्याची घटना ताजी असतानाच येथील टिळकनगरमधील सुयोग सभागृहाच्या परिसरातील हरी मुकुंद सोसायटीत राहणाऱ्या दीपाली दोशी व हेत दोशी या आईमुलाला डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्या दोघांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत एकाच घरातील अनेक व्यक्तींना डेंग्यूची लागण झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी नांदिवली परिसरातील सर्वाेदय पार्क गृहसंकुलात १५ ते २० जणांना या आजाराने ग्रासले होते. तेथे राहणाऱ्या सोहम तावडे या १४ वर्षांच्या मुलाला मुलुंड येथील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. या गृहसंकुलाच्या मागील बाजूस असलेल्या सोसायट्यांमध्येही डेंग्यूचे रुग्ण आढळले होते.
दरम्यान, टिळकनगर परिसरातील दोशी कुटुंबातील मायलेकाला डेंग्यूसदृश आजाराची लागण झाल्याची माहिती मिळताच महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी कीटकनाशकाची फवारणी केली. परिसरातील गटारांवरील झाकणे उघडी असल्याने डासांची मोठ्या प्रमाणावर पैदास होत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. दरम्यान, पावसाळी वातावरणामुळे तापाचे रुग्ण वाढत आहेत. श्रावणातील ऊन-पावसाच्या खेळामुळे रुग्णांची संख्या जोमाने वाढली होती. त्यात व्हायरल तापासह डेंग्यू, मलेरिया आणि काविळीचे रुग्ण आहेत. आता परतीच्या पावसातही आजारांची ही स्थिती कायम आहे. पालिकेच्या शास्त्रीनगर आणि रुक्मिणीबाई रुग्णालयांच्या बाह्य रुग्ण विभागात तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणात तापाचे रुग्ण उपचार घेत आहेत. डेंग्यू आणि मलेरियाबरोबर काविळ, कॉलरा, लेप्टोस्पायरोसीस, गॅस्ट्रो, टायफॉईड यांचे रुग्णही आढळत आहेत. गेल्या महिन्यात काविळीच्या रुग्णांमध्येही लक्षणिय वाढ झाली होती. त्यामुळे केडीएमसीने नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवतही पथनाट्यातून साथीच्या आजारांवर जागृती करण्यात आली होती. परंतु परिस्थिती ‘जैसे थे’ राहिल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)