डोंबिवलीत ठणठणाट
By admin | Published: May 4, 2017 05:43 AM2017-05-04T05:43:55+5:302017-05-04T05:43:55+5:30
एकीकडे पाणीकपातीसाठी मंगळवारी शहराचा पाणीपुरवठा बंद असताना दुसरीकडे जलवाहिनी स्थलांतराच्या कामाला लागलेला
डोंबिवली : एकीकडे पाणीकपातीसाठी मंगळवारी शहराचा पाणीपुरवठा बंद असताना दुसरीकडे जलवाहिनी स्थलांतराच्या कामाला लागलेला विलंब डोंबिवलीकरांना चांगलाच भोगावा लागला. मंगळवारचे शटडाउन आणि त्यात बुधवारी सकाळीही पाणी न आल्याने डोंबिवली पूर्व-पश्चिम भागात निर्माण झालेल्या पाण्याच्या ठणठणाटाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. अखेर दुपारी पाणीपुरवठा सुरू झाला खरा, परंतु सकाळचे नियोजन बिघडल्याने याची झळ दिवसभर विविध भागांमध्ये जाणवत होती.
केडीएमसी क्षेत्राला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी १५ जुलैपर्यंत पुरावे, यासाठी लघुपाटबंधारे विभागाने पाणीकपात लागू केली आहे. यामुळे मंगळवारी कल्याण-डोंबिवली शहरांचा तर शुक्रवारी २७ गावांमधील पाणीपुरवठा बंद असतो. शहरांचा पाणीपुरवठा मंगळवारी बंद असताना शहाड येथे काँक्रिटच्या कामात अडथळा ठरणारी तेथील १४०० मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी अन्यत्र स्थलांतरित करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले होते. या कामासाठी मध्यरात्री १ पर्यंत वेळ निश्चित केली होती. परंतु, हे काम वेळेत पूर्ण झाले नाही. त्यामुळे मोहिली उदंचन केंद्रामधून नेतीवली जलशुद्धीकरण केंद्राला पाणी सोडण्यात आले नाही. नेतीवली केंद्रातून डोंबिवलीला पाणीपुरवठा होतो. परंतु, या केंद्रात पाणी न आल्याने त्याचा फटका डोंबिवली शहराला बसला. यात मंगळवारच्या दिवसभराच्या शटडाउननंतर बुधवारी सकाळीही नागरिकांना पाणी मिळाले नाही. (प्रतिनिधी)
दुपारपर्यंत पुरवठा सुरळीत
जलवाहिनीच्या स्थलांतराच्या कामाला विलंब लागल्याने पाणी सकाळी मिळाले नाही. परंतु, दुपारपर्यंत पाणीपुरवठा सुरू झाल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता अनिरुद्ध सराफ यांनी दिली.