डोंबिवलीत भाजपाची गुंडगिरी
By admin | Published: December 23, 2015 01:59 AM2015-12-23T01:59:05+5:302015-12-23T01:59:05+5:30
सागर्ली गावातील अनधिकृत बांधकाम तोडण्यास गेलले एमआयडीसीचे अधिकारी आणि पोलिसावर सागर्ली गावचे माजी सरपंच आणि भाजपचे विद्यमान नगरसेवक महेश पाटील आणि
डोंबिवली : सागर्ली गावातील अनधिकृत बांधकाम तोडण्यास गेलले एमआयडीसीचे अधिकारी आणि पोलिसावर सागर्ली गावचे माजी सरपंच आणि भाजपचे विद्यमान नगरसेवक महेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दगडफेक केल्याची घटना मंगळवारी घडली. त्यात एमआयडीसीचे सहाय्यक अभियंता नितीन अंकूश व पोलिस हवालदार एस. बी. चवरे यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना उपचारासाठी एम्स रूग्णालयात दाखल केले आहे.
दरम्यान, पोलिस आणि अधिकाऱ्यांवर दगडफेक करणारे नगरसेवक पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांंना ताब्यात घेऊन स्थानिक मानपाडा पोलीस ठाण्यात आणण्यात आले. तेथेही त्यांनी गोंधळ घातला. अखेर नगरसेवक महेश पाटील आणि त्याच्या साथीदारांवर ३२३, ३२४ आणि १५३ अन्वये मानपाडा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाताच पोलिसांकडून यावेळी लाठीचार्ज करण्यात आला. अधिकाऱ्यांना संरक्षण देणाऱ्या पोलिसांवरच भाजप नगरसेवक महेश पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दगडफेक केली. यात हवालदार एस. बी. चवरे या पोलिसाच्या डोक्याला वीट लागल्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली. तसेच एमआयडीसीचे सहाय्यक अभियंता नितीन अंकूश हेही गंभीर जखमी झाले आहेत.