डोंबिवलीत आवक ३० टक्के घटली
By admin | Published: June 2, 2017 05:39 AM2017-06-02T05:39:36+5:302017-06-02T05:39:36+5:30
शेतकरी संपाच्या पहिल्या दिवशी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीला झळ लागली नसली, तरी उद्या शुक्रवारपासून भाजीपाल्याची
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : शेतकरी संपाच्या पहिल्या दिवशी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीला झळ लागली नसली, तरी उद्या शुक्रवारपासून भाजीपाल्याची आवक रोडावली, तर भाजीपाल्याच्या दरात १० ते १५ टक्के वाढ होण्याची भीती भाजीपालाविक्रेते व्यक्त करीत आहेत. मात्र, किरकोळ बाजारात भाजीपाल्याची आवक ३० टक्क्यांनी घटल्याचा दावा करीत गुरुवारपासून १० ते २० रुपयांनी भाज्या महाग झाल्या आहेत. त्याची थेट झळ ग्राहकांच्या खिशाला बसली आहे.
राज्य व राष्ट्रीय महामार्गावरून होणारी भाजीपाल्याची वाहतूक शेतकऱ्यांनी रोखून धरली आहे. त्यामुळे उद्यापासून शेतमालाची वाहतूक करण्यास शेतमाल वाहक संघटनांनी असमर्थता दर्शवली आहे, अशी माहिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रवींद्र घोडविंदे यांनी दिली.
परिणामी, उद्यापासून बाजारातील भाजीपाल्याची आवक ठप्प होण्याची चिन्हे आहेत. आज बाजार समितीत २१० टन भाजीपाला आला होता. कल्याण ग्रामीण परिसरातून २ टन भाजीपाला बाजारात आला होता. उन्हाळ्यात भाजीपाल्याची आवक तशीही कमीच असते. या काळात दररोज २१० ते २२५ टन भाजीपाला बाजारात येतो.
त्यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, कांदाबटाटा, लसूण, अन्नधान्य, फुले यांचा समावेश असतो. हा माल नाशिक व नगर, पुणे या भागांतून जास्त प्रमाणात येतो. मुंबई-पुणे, कल्याण-नगर, मुंबई-नाशिक महामार्गावरून भाजीपाल्याची वाहतूक केली जाते. आलेला माल हा आजच्या दिवसापुरता मर्यादित होता.
मर्यादित मालामुळे आता उद्या काय विकणार, हा घाऊक व किरकोळ भाजीपालाविक्रेत्यांपुढे प्रश्न आहे. त्यामुळे आज न विकला गेलेला भाजीपाला बाजारात उद्यापासून चढ्या दराने विकला जाईल. आज भाव वाढलेला नसला, तरी उद्यापासून तो वाढण्याची शक्यता घोडविंदे यांनी व्यक्त केली. तसे झाल्यास नागरिकांना याचा फटका बसेल.
शेतकरी संपावर गेल्याने खुल्या किरकोळ बाजारात आज मिरचीचा भाव १२० रुपये होता. सिमला मिरचीचा भाव ४० रुपयांवरून ६० रुपये किलो, भेंडी ४० रुपये किलोवरून ६० रुपये, गवार ४० रुपयांवरून प्रतिकिलो ६० रुपये, काकडी २० रुपये किलोवरून ४० रुपये, फ्लॉवर ३० रुपयांवरून ४० रुपये, कोथिंबीर जुडी १० रुपयांनाच असली, तरी आकार छोटा झाला आहे. किरकोळ भाजीपाला बाजारात गुरुवारी ३० टक्के माल कमी आला, असा दावा विक्रेत्यांनी केला.