डोंबिवली : पेव्हर ब्लॉकच्या कामात कोट्यवधींचा घोटाळा, रमेश म्हात्रेंचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 01:13 AM2018-02-12T01:13:45+5:302018-02-12T01:13:54+5:30
शासकीय निधीचा वापर खाजगी जागेसाठी करता येत नाही परंतु, केडीएमसी परिक्षेत्रात हे नियम धाब्यावर बसवलेले दिसतात. नियम बाजूला सारून खाजगी सोसायट्यांमध्ये टाईल्स, पेव्हर ब्लॉकची कामे केल्याचा भांडाफोड केडीएमसीचे काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रमेश पद्माकर म्हात्रे यांनी केला आहे. त्यांनी याप्रकरणी महापालिका, बाजारपेठ पोलीस ठाणे आणि लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली आहे. दरम्यान, बाजारपेठ
डोंबिवली : शासकीय निधीचा वापर खाजगी जागेसाठी करता येत नाही परंतु, केडीएमसी परिक्षेत्रात हे नियम धाब्यावर बसवलेले दिसतात. नियम बाजूला सारून खाजगी सोसायट्यांमध्ये टाईल्स, पेव्हर ब्लॉकची कामे केल्याचा भांडाफोड केडीएमसीचे काँग्रेसचे माजी विरोधी पक्षनेते रमेश पद्माकर म्हात्रे यांनी केला आहे. त्यांनी याप्रकरणी महापालिका, बाजारपेठ पोलीस ठाणे आणि लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली आहे. दरम्यान, बाजारपेठ पोलिसांकडूनही या प्रकरणी चौकशीला प्रारंभ झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.
कल्याण डोंबिवलीतील बहुतांश प्रभागांमध्ये पेव्हर ब्लॉकची कामे नियमबाह्य केल्याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे. तसेच ज्या ठिकाणी कामे मंजूर करण्यात आली, त्या कामाचा प्रशासकीय आदेश काढण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात दुसºयाच ठिकाणी ही कामे करण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नगरसेवक अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगनमत करून भ्रष्टाचार केल्याचा आरोप म्हात्रे यांचा आहे. रस्त्याच्या कामांमध्ये स्टोन पावडरचा वापर करून ही कामेही निकृष्ट दर्जाची केली असून गटाराची कामे करतानाही सुस्थितीतील गटारे तोडण्यात आली आहेत. तर अनेक ठिकाणी गटारांची नादुरूस्ती करून नवीन बील काढण्यात आल्याचे म्हात्रे यांचे म्हणणे आहे.
विशेष बाब म्हणजे लाचलुचपत विभागाकडे केलेल्या तक्रारीवर या प्रकरणाची संबधित विभागाकडून चौकशी करावी असे पत्र लाचलुचपत विरोधी विभागाचे पोलीस अधीचक संग्रामसिंह निशाणदार यांनी पालिका आयुक्तांना पाठवले आहे. पण याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे म्हात्रे यांचे म्हणणे आहे.
याप्रकरणातील संबंधित अधिकाºयांवर कारवाई व्हावी अशी मागणी म्हात्रे यांनी आयुक्त पी. वेलरासू यांच्याकडे केली आहे.
पोलिसांकडून चौकशी सुरू -
डोंबिवली पश्चिमेतील प्रभाग क्र ५५ नवागाव आनंदनगर मधील ठाकुरवाडी परिसरातील प्रदीप सोसायटी ते शिवाजी पार्क सोसायटीपर्यंत रस्ता तयार करून पायवाट करणे व पेव्हर ब्लॉक बसवणे या कामाचे प्रशासकीय आदेश काढण्यात आले होते.
मात्र प्रत्यक्षात हे काम पंडीत दिनदयाळ रोडवरील एका खाजगी सोसायटीच्या आवारात करण्यात आले. मंजुरी एका ठिकाणची प्रत्यक्षात काम दुसरीकडे याचा भांडाफोड म्हात्रे यांनी माहितीच्या अधिकारात उघडकीस आणला आहे. या प्रकरणाची तक्रार बाजारपेठ पोलिसांकडून सुरू करण्यात आली आहे.