डोंबिवली सायकल क्लबच्या उपक्रमा:सायकल सफारीद्वारे वृक्ष लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2018 04:59 PM2018-06-07T16:59:53+5:302018-06-07T16:59:53+5:30
जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी उपक्रम झाले. झाडे लावा पर्यावरण जगवा या हेतूने डोंबिवली सायकल क्लब देखिल सायकल सफारी करतांना वृक्षारोपण करत आहे. यंदाचे क्लबचे पाचवे वर्ष असून सायकल चालवण्यासाठी येणा-या प्रत्येक सायकलपटूने बीया आणायच्या आणि त्या वाटेत रस्त्याच्या कडेला अथवा मोकळी जागा मिळेल तेथे लावयच्या असा उपक्रम असतो.
डोंबिवली: जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने विविध ठिकाणी उपक्रम झाले. झाडे लावा पर्यावरण जगवा या हेतूने डोंबिवली सायकल क्लब देखिल सायकल सफारी करतांना वृक्षारोपण करत आहे. यंदाचे क्लबचे पाचवे वर्ष असून सायकल चालवण्यासाठी येणा-या प्रत्येक सायकलपटूने बीया आणायच्या आणि त्या वाटेत रस्त्याच्या कडेला अथवा मोकळी जागा मिळेल तेथे लावयच्या असा उपक्रम असतो.
यासंदर्भात क्लबचे संस्थापक डॉ. सुनिल पुणतांबेकर यांनी सांगितले की, यंदाचे ५ वे वर्ष असून सदस्यांना आता सांगायला लागत नाही. मे महिन्यापासूनच झाड गोळा करणे, रोप वाढवणे, बीया गोळा करुन ठेवणे असे नीत्याने करणारे सायकलपटू आहेत. पर्यावरण दिनानंतरचा पहिल्या रविवारपासून साधारणपणे पावसाळा संपेस्तोवर हा उपक्रम सुरू असतो. कोणी किती झाडे लावली अथवा किती बीया लावल्या यापेक्षा झाड लावण्यामध्ये आनंद व्यक्त केला जातो. अबालवृद्ध त्या उपक्रमात आवर्जून सहभागी होत असल्याचे ते म्हणाले.
सायकल चालवतांना पर्यावरणाचा संदेश दिला जातोच पण तरीही आणखी वर्षभर सहजपणे पर्यावरणीय संतुलनासाठी जे करता येइल ते आवर्जून करण्याचा सदस्यांचा मानस असतो. अनेकांनी सायकलवर नो प्लास्टिक, नो हॉर्न ओके प्लीज असे संदेश देणारे फलक लावले आहेत. आपापल्या परीने प्रत्येकाने स्वत:हून उपक्रम करणे, त्यात सहभागी होणे आवश्यक असल्याचे डॉ. पुणतांबेकर म्हणाले. क्लबचे सदस्य जाणकार असून त्यांना पर्यावरणाची आवड आहे, हे त्यांच्या कृतीतून स्पष्ट होते असे ते म्हणाले. अनेकांनी वड, पिंपळ रोप लावली आहेत. तर काहींनी आंबा, जांभुळ, पेरु, कोणी फुलझाड, तर कोणी अन्य वृक्ष लागवड करत असतात. डोंबिवलीच्या पंचक्रोशीतच नव्हे तर जिल्ह्यात आणि अष्टविनायक मार्गावर देखिल हा उपक्रम काहींनी केला आहे. काही ठिकाणी चांगल्या झाडांमध्ये त्याचे रुपांतर झाल्याचे ते म्हणाले. सायकल घेतांना स्वत:ला पिण्यासाठी पाण्याची बाटली घेतांनाच आणखी एक बाटली व खड्डा खणण्यासाठी सळई अथवा चांगला बांबू घ्यायचा ही जबाबदारी देखिल आपापल्या स्तरावर सगळे विभागून घेतात. त्यामुळे सामुहिक पणे वृक्ष लागवड केली जात असून त्यात सातत्य आहे हे क्लबच्या सदस्यांचे विशेष असल्याचे ते सांगतात.