डोंबिवली होणार ई-कचरामुक्त, ७१३ किलो कचरा जमा
By admin | Published: May 2, 2016 01:14 AM2016-05-02T01:14:30+5:302016-05-02T01:14:30+5:30
मानवी जीवनाला सगळ््यात धोका आहे तो ई-कचऱ्याचा. त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावली जात नाही. व्हीजन डोंबिवली उपक्रमातंर्गत शहर ई कचरा मुक्त करण्यासाठी
डोंबिवली : मानवी जीवनाला सगळ््यात धोका आहे तो ई-कचऱ्याचा. त्यावर शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करुन त्याची विल्हेवाट लावली जात नाही. व्हीजन डोंबिवली उपक्रमातंर्गत शहर ई कचरा मुक्त करण्यासाठी रविवारी उपक्रम राबविला. या उपक्रमातंर्गत ७१३ किलो वजनाचा ई कचरा गोळा करण्यात आला. हा कचरा
नागरिकांनी स्वत:हून शिबिरात आणून दिला. जमा झालेल्या कचऱ्यावर पुण्यातील कुलदीप ई स्क्रॅप मटेरियल ही कंपनी शास्त्रोक्त प्रक्रिया करणार आहे.
शहरातील के. बी. वीरा शाळेत ई कचरा शिबिर झाले. या उपक्रमाची सुरुवात आमदार रवींद्र चव्हाण यांनी स्वत: ई कचरा देऊन केली.
नागरीकांनी संगणक, टेपरेकॉर्डर, मोबाईल, की- बोर्ड आदी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणून दिल्या. या प्रकल्पाचे प्रमुख डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी सांगितले की, वापरात नसलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू या घातक असतात. या ई कचऱ्याची ८० टक्के विल्हेवाट ही अशास्त्रीय पद्धतीने लावली जाते. एकतर हा कचरा जाळला जातो. त्यातून अनेक विषारी वायू बाहेर पडतात. ते नागरिकांच्या आरोग्यासाठी घातक आहे. काहीवेळा हा कचरा जमिनीत पुरला जातो. त्यातील धातू भूगर्भातील पाण्यात मिसळतात. तेच पाणी आपल्या शरीरात गेले की अनेक आजार होतात, असे ते म्हणाले. रक्ताच्या कर्करोगापासून मेंदूच्या विकारापर्यंत माणूस बळी पडतो.
व्हीजन डोंबिवली अंतर्गत ई कचरा मुक्त डोबिवली हे लक्ष्य डोळयासमोर ठेवले आहे. त्यात प्रामुख्याने स्वयंसेवकांचा गट तयार करणे, त्यांना दहा तासाचे प्रशिक्षण देणे, प्रदर्शन व चर्चासत्र भरविणे, ई कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या सरकारमान्य कंपन्यांना कचरा गोळा करुन देणे. त्यासाठी ई कचरा स्टेशन उभारणे हा चार कलमी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याची ही सुरुवात असल्याचे त्यांनी नमूद केले.
यापूवी रोटरीच्या पुढाकाराने मे २०१४ मध्ये ई कचरा गोळा करण्याचे शिबिर झाले होते. त्यातून १.७ टन कचरा गोळा केला होता. आॅगस्ट २०१५ मध्ये झालेल्या शिबिरात १.३ टन कचरा गोळा झाला होता. डोंबिवली पूर्व व पश्चिम येथे ई कचरा स्टेशन सुरु करण्यासाठी जागा देण्याची मागणी डॉ. कोल्हटकर यांनी पालिकेकडे केली आहे. महापालिकेने या मागणीचा सकारात्मक विचार केला जाईल असे स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आघाडीवर
भारतातील प्रमुख शहरांमध्ये ई कचरा निर्माण करण्यात मुंबई आघाडीवर आहे. मुंबईत २४ टक्के, दिल्लीत २१, बेंगळुरू १३ आणि पुण्यात १० टक्के ई कचरा तयार होतो. देशातील राज्यांचा विचार केला तर महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या दोन राज्याची ई कचरा निर्माण करण्यात आघाडी आहे.
महिन्याला ५० टन कचऱ्यावर प्रक्रिया
कुलदीप ई स्क्रॅप मटेरियलचे कंपनीचे प्रमुख अशोक भारस्कर यांनी सांगितले की, दररोज दीड टन ई कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. महिन्याला ५० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची प्रकल्पाची क्षमता आहे. देशात अशा प्रकारचा प्रकल्पच नाही. सध्या ही कंपनी गुजरात,आंध्र प्रदेश, राजस्थान राज्यातून ई कचरा आणून त्यावर प्रक्रिया करते.