डोंबिवली बस स्थानकावरुन शिवसेना-मनसेमध्ये जुंपली
By Admin | Published: May 10, 2017 12:12 AM2017-05-10T00:12:58+5:302017-05-10T00:12:58+5:30
असुविधांच्या विळख्यातून डोंबिवलीचे बस स्थानकाला बाहेर काढावे आणि प्रवाशांच्या मागणीनुसार डोंबिवली-पुणे ही बससेवा सुरु करावी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : असुविधांच्या विळख्यातून डोंबिवलीचे बस स्थानकाला बाहेर काढावे आणि प्रवाशांच्या मागणीनुसार डोंबिवली-पुणे ही बससेवा सुरु करावी, यासाठी मंगळवारी मनसे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डोंबिवली बस स्थानकाचा पाहणी दौरा केला आणि दोन्ही पक्ष आमने-सामने आले. त्यांच्या बस स्थानक व प्रवाशांना सुविधा पुरविण्याच्या मागणीवरुन चांगलीच जुंपली. आम्ही पाहणी करणार असतानाही मनसेने घुसखोरी केल्याचा आरोप शिवसेनेने केला, तर सत्तेत असताना, त्या खात्याचे मंत्रीपद हाती असताना पाहणी कसली करता, निर्णय घ्या, असे उत्तर मनसेने दिल्याने हा प्रश्न तापला.
‘लोकमत’च्या ‘रिपोर्टर आॅन द स्पॉट’ या मालिकेअंतर्गत डोंबिवली, कल्याण आणि विठ्ठलवाडी आगाराचे प्रश्न मांडण्यात आले होते. त्याची दखल सर्वच राजकीय पक्षांनी घेतली आणि डोंबिवली-पुणे बससेवा तत्काळ सुरू करण्याची मागणी केली. तिन्ही बस स्थानकातील गैरसोयी दूर करण्यासाठी सर्व पक्षांकडून पाठपुरावाही केला जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्यांनी मंगळवारी पाहणी करणार असल्याचे सांगितले. मात्र मनसेचे शहराध्यक्ष मनोज घरत यांच्यासह प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, पदाधिकारी सागर जेधे व रविंद्र गरुड यांनी सकाळीच डोंबिवली बस स्थानकात धाव घेतली. त्या पाठोपाठ शिवसेनेचे शहर प्रमुख भाऊ चौधरी यांच्यासह विधानसभा संघटक तात्या माने, उपविभागप्रमुख सतीश मोडक, शाखाप्रमुख आमोद वैद्य यांनीही बस स्थानकात प्रवेश केला. मनसेपाठोपाठ शिवसेनेचे पदाधिकारी येताच दोन्ही पक्ष आमने-सामने आले. आम्ही पाहणी करणार जाहीर केले होते, तरीही मनसेने घुसखोरी केल्याचा आरोप चौधरी यांनी केला.
डोंबिवली स्टेशनपर्यंत बस येणे गरजेचे : चौधरी-
स्थानकाची पाहणी करण्यासाठी पोहचलेले शिवसेनेचे शहरप्रमुख भाऊ चौधरी यांनी सांगितले, स्थानकाची संरक्षक भिंत काही पडली आहे. पाणपोई बंद आहे. असुविधा आहेत. रात्रीच्या वेळी बसेस डोंबिवली स्टेशन परिसरात ला येतात. तशाच त्या इतर वेळीही येणे गरजेचे आहे. बस स्थानकाच्या सोयी सुविधांविषयी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेनेचे माजी नगरसेवक व विधानसभा संघटक तात्या माने पाठपुरावा करीत आहेत. शिवसेना पुन्हा निवेदन देऊन पाहणी करणार असल्याचे शिवसेनेने जाहीर करताच त्याठिकाणी मनसे घुसखोरी करण्यासाठी पोचल्याचा आरोप चौधरी यांनी केला.
अद्याप पत्रव्यवहार नाही
राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने या विषयावर पत्रव्यवहार करण्याचे जाहीर केले. पण अजून तो कोणीही केलेला नाही. विरोधी पक्षाच्या भूमिकेतून मनसे जोसकसपणे पुढे येत आहे. पण शिवसेना सत्तेत असून विरोधकांची भूमिका बजावत आहे. ती संधी त्यांनी आम्हाला द्यावी, असा टोला मनसेने लगावला आहे.