डोंबिवली : चुकीच्या नियोजनाचा रेल्वे प्रवाशांना फटका ,दोघे जखमी : उद्घोषणेचा बसला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2017 01:52 AM2017-10-09T01:52:08+5:302017-10-09T01:52:18+5:30
रेल्वे स्थानकात गर्दीमुळे होणारी रेटारेटी आणि चुकीच्या उद्घोषणेमुळे प्रवाशांची एका फलाटाहून दुसरीकडे जाताना होणारी धावपळ काही नवीन नाही.
अनिकेत घमंडी
डोंबिवली : रेल्वे स्थानकात गर्दीमुळे होणारी रेटारेटी आणि चुकीच्या उद्घोषणेमुळे प्रवाशांची एका फलाटाहून दुसरीकडे जाताना होणारी धावपळ काही नवीन नाही. मात्र, या प्रकारांमुळे डोंबिवलीतील दोन प्रवासी जखमी झाल्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत. दरम्यान, अशा घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे.
पहिल्या घटनेत डोंबिवली स्थानकात चुकीच्या पद्धतीने झालेल्या उद्घोषणेमुळे एका फलाटाहून दुसºया फलाटात जाताना रवी मुठे ( रा. पीएनटी कॉलनी) यांच्या हाताला दुखापत झाल्याची घटना बुधवारी सकाळी ११.५५ च्या सुमरास घडली. डोंबिवलीहून मुंबईला जाणारी जलद लोकल पकडण्यासाठी मुठे फलाट क्रमांक पाचवर उभे होते. मात्र, ही गाडी उशिराने धावत असल्याची उद्घोषणा झाल्याने ते धीमी लोकल पकडण्यासाठी फलाट क्रमांक तीनवर आले. पण तेथे ठाणे लोकल येणार होती. तेवढ्यात पुन्हा जलदमार्गे मुंबईला जाणारी लोकल येत असल्याची उद्घोषणा झाली. त्या गोंधळात झालेल्या धावपळीत मुठे यांना चक्कर आली. तसेच त्यांच्या हाताच्या कोपराला मार लागला.
दुसºया घटनेत महिनाभरापूर्वी ठाणे रेल्वेस्थानकात गर्दीमुळे झालेल्या रेटारेटीत हेमा मांढरे (रा. नामदेव पथ) या युवतीच्या डाव्या हाताला दुखापत झाली. फलाट क्रमांक १० वर ही घटना घडली. त्या वेळी तिला फलाटात तासभर उपचार मिळाले नव्हते. त्यामुळे तिची गैरसोय झाली होती. अखेरीस स्थानक प्रबंधकांनी माहिती घेत उपचार केल्याचे ती म्हणाली.