डोंबिवली-माणकोली-कल्याण बोटसेवा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2018 06:13 AM2018-05-13T06:13:54+5:302018-05-13T06:13:54+5:30
कल्याण-डोंबिवलीला लाभलेल्या विस्तीर्ण खाडीकिनाऱ्याचा लाभ जलवाहतुकीसाठी व्हावा, यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जाणार आहेत
डोंबिवली : कल्याण-डोंबिवलीला लाभलेल्या विस्तीर्ण खाडीकिनाऱ्याचा लाभ जलवाहतुकीसाठी व्हावा, यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जाणार आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांची त्यासाठी मोलाची साथ असल्याने या मार्गाचा जलदगतीने विकास होणार आहे, असे मत महापौर विनीता राणे यांनी शनिवारी व्यक्त केले.
पश्चिमेतील जुन्या डोंबिवली परिसरातून माणकोली-कल्याण-डोंबिवलीदरम्यानच्या खासगी बोटफेरीचा शुभारंभ राणे यांनी शनिवारी केला. याप्रसंगी सभागृह नेते राजेश मोरे, नगरसेवक विश्वनाथ राणे, नगरसेविका दीपाली पाटील, संगीता पाटील, माजी नगरसेवक पंढरी पाटील, बोटमालक विलास ठाकूर आदी उपस्थित होते.
डोंबिवली- माणकोली-कल्याण- डोंबिवली या मार्गावरील खाजगी बोटसेवेला २५ मेपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर सर्व परवानग्या मिळाल्या आहेत. त्याची खातरजमा झाल्यावरच महापौरांनी या बोटसेवेचा शुभारंभ केला. लहान मुलांसाठी २५ तर मोठ्यांसाठी ५० रुपये, असे भाडे प्रतिप्रवासासाठी आकारले जाणार आहे.
डोंबिवली-माणकोलीसाठी सुमारे १० मिनिटे, तर कल्याणसाठी २० मिनिटे लागतील. येत्या काळात मुंब्रा भागातही ही प्रवासी फेरीबोट नेण्याचा मानस असल्याचे सांगण्यात आले. या परिसरात आधीही एक बोट कार्यरत आहे. आता ही दुसरी फेरीबोट प्रवाशांसाठी दाखल झाली आहे. एका बोटीतून एका वेळी २० ते २५ प्रवासी प्रवास करू शकतील.
याच मार्गावरून ठाणेमार्गे वसई आणि नवी मुंबई येथे जलवाहतुक सुरू केली जाणार आहे. त्यातील पहिल्या टप्प्याला मंजुरी मिळाली आहे.
सध्या दररोज दीडशेहून अधिक नागरिक या फेरीबोटीचा लाभ घेतात. त्या नागरिकांना अधिकाधिक सुविधा मिळाव्यात. त्यांचा वेळ वाचावा, यासाठी अशा योजनांना पाठबळ मिळणे आवश्यक आहे, असे या वेळी सांगण्यात आले.