डोंबिवलीचे नगरसेवक कुणाल पाटील सुपारी प्रकरण: ग्रामीणकडून शहर पोलिसांकडे वर्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2017 09:13 PM2017-12-24T21:13:28+5:302017-12-24T21:33:56+5:30
भाजपचे कल्याण डोंबिवलीतील सहयोगी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येचा कट डोंबिवलीतच शिजल्याने हे प्रकरण आता ठाणे ग्रामीणकडून शहर पोलिसांच्या मानपाडा पोलिसांकडे वर्ग केले आहे.
ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भाजपाचे सहयोगी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी दिल्याप्रकरणी भाजपाचेच नगरसेवक महेश पाटील यांच्याविरुद्ध गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या हत्येचा कट डोंबिवलीतच शिजला, तसेच त्यासाठी मारेकरी डोंबिवली परिसरात जमा झाले होते, असा तपशील आणि पुरावे हाती आल्याने ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांच्या आदेशानुसार हे संपूर्ण प्रकरण कल्याण परिमंडळातील मानपाडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.
भिवंडीत कुडूस येथे एका दरोड्याचा तपास ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांचे पथक करत होते. त्यांनी १३ डिसेंबरला भिवंडीतून कैलास घोडविंदे, राजू शेट्टी, अलुद्दीन शेख, विजय मेनबन्सी आणि सुजित नलावडे आदी सहा दरोडेखोरांना अटक केली. त्यांच्यापैकीच विजयच्या माहितीवरून कुणाल यांच्या हत्येची सुपारी महेश पाटील यांनी दिल्याचे उघड झाले. त्यानंतर, पोलिसांनी यातील सर्व बाबींची खातरजमा केली. आरोपी तसेच सुपारी देणारे महेश पाटील यांचे टॉवर लोकेशन तपासण्यात आले. त्यानुसार, २९ आणि ३० नोव्हेंबर २०१७ या दोन्ही दिवशी या सहाही जणांचे ‘लोकेशन’ ठाकुर्ली गावाजवळ आढळले. त्यांच्यापैकी दाभाडे हाही नाशिक येथून तिथे आल्याचे स्पष्ट झाले. या सर्वांचे लोकेशन कुणाल पाटील यांच्या घराजवळ मिळाले. त्याच वेळी ते त्यांची हत्या करणार होते. कुणाल यांनीही २०१५ मध्ये महेश यांना ठार मारण्याची सुपारी दिली होती, असा आरोप आहे. ५० लाखांच्या या सुपारीपैकी १० लाख रुपये त्यांनी घेतले. अॅडव्हान्स पैसे घेऊनही ते ‘कामगिरी’ पार पाडण्यात अयशस्वी ठरल्यामुळे पुन्हा १६ डिसेंबरला ते हल्ल्याच्या तयारीत होते. या सर्वच बाबींची पडताळणी झाल्यानंतर ठाणे ग्रामीणच्या गणेशपुरी पोलीस ठाण्यात २१ डिसेंबरला रात्री १० च्या सुमारास महेश पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. कुणाल यांच्या हत्येसाठी या सर्वांची पहिली बैठक महेश पाटील यांच्याच डोंबिवलीतील कार्यालयात झाली. दुसरी बैठक भिवंडी परिसरात झाली. ही दोन्ही ठिकाणे ठाणे शहर आयुक्तालयाच्या कल्याण परिमंडळातील मानपाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातील आहेत. त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण मानपाडा पोलिसांकडे वर्ग करण्याचे आदेश अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी दिले. हत्येचा कट करणे, हत्येचा प्रयत्न करणे आदी कलमांखाली मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.