डोंबिवली : नवजात अर्भकाचा आजीनेच चिरला गळा, चौघे ताब्यात : अनैतिक संबंधांतून दिला जन्म
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 02:49 AM2017-10-14T02:49:49+5:302017-10-14T02:50:46+5:30
गळा चिरलेल्या अवस्थेत आढळलेल्या नवजात अर्भकाच्या हत्येचा उलगडा करण्यात कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले आहे.
डोंबिवली : गळा चिरलेल्या अवस्थेत आढळलेल्या नवजात अर्भकाच्या हत्येचा उलगडा करण्यात कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांना यश आले आहे. अनैतिक संबंधांतून मुलीने जन्म दिलेल्या अर्भकाची त्याच्या आजीनेच हत्या केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी चौघा आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना मानपाडा पोलिसांच्या हवाली केले आहे.
पिसवली परिसरातील साई सिद्धी पार्क इमारतीच्या मागील बाजूस सोमवारी एका नवजात अर्भकाचा गळा चिरलेल्या अवस्थेत बेवारस मृतदेह आढळला होता. हा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत टाकण्यात आला होता. मानपाडा पोलीस व कल्याण गुन्हे अन्वेषण विभाग या गुन्ह्याचा समांतर तपास करत होते.
साई सिद्धी पार्कमधील रहिवासी व वॉचमन यांची पोलिसांनी विचारपूस केली असता तेथे राहणारी मंदिरा सपन बॅनर्जी ही २० वर्षीय तरुणी अनैतिक संबंधांतून गर्भवती होती, अशी माहिती समोर आली. त्यामुळे पोलिसांनी तिची चौकशी केली. तिचे महेश बांडे आणि अन्य एकासोबत प्रेम व शरीरसंबंध होते. यातून ती गर्भवती राहिली. तिने याची माहिती दोघांनाही दिली. परंतु, त्यांनी तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. त्या खाल्ल्याने तिच्या पोटात दुखू लागले. यात तिच्या आईने शांता हिने तिचे बाळंतपण करून जन्माला आलेल्या नवजात बालकाचा घरातील सुरीने गळा चिरला. पुरावा नष्ट करण्याकरिता अर्भकाला प्लास्टिक कागदात गुंडाळून फेकून दिल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजू जॉन यांनी सांगितले.