मराठा समन्वयकांना डोंबिवलीत नोटिसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 03:15 AM2018-08-07T03:15:23+5:302018-08-07T03:15:47+5:30
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
डोंबिवली : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे समन्वयक आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन पोलिसांकडून कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्याचे आवाहन केले जात असताना डोंबिवलीमधील काही समन्वयकांना पोलिसांनी १४९ अन्वये शांतताभंग न करण्याच्या नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.
सध्या मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वत्र आंदोलने सुरू आहेत. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २५ जुलैला कल्याणमध्ये तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. त्यापूर्वी काही ठिकाणी वाहनांची तोडफोड करण्यात आली, तर वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांनाही धक्काबुक्की आणि दमदाटी करण्याचा प्रकार घडला होता. आरक्षणासाठी पाठपुरावा न करणाºया मराठा आमदारांचा निषेध म्हणून तहसील कार्यालय परिसरात ठिय्या मांडलेल्या कार्यकर्त्यांनी मुंडण करून आमदारांचे प्रतीकात्मक श्राद्धही यावेळी घातले होते. तर, डोंबिवलीत आंदोलन करणाºया १६ जणांना अटक करण्यात आली होती.
दरम्यान, ९ आॅगस्ट या क्रांतिदिनी गुरुवारी पुन्हा महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. यादिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, तसेच शांतता अबाधित राहावी, यादृष्टीने पोलिसांकडून बैठका घेण्यात येत आहेत. यामध्ये स्थानिक पोलीस ठाण्यांच्या माध्यमातून समन्वयक तसेच कार्यकर्त्यांना नोटिसाही जारी करण्यात आल्या आहेत. याला डोंबिवलीतील मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक निलेश चव्हाण यांनी दुजोरा दिला आहे. तर, कल्याणमधील समन्वयक श्याम आवारे यांनी मात्र पोलिसांकडून बैठका घेतल्या जात असून नोटिसा बजावल्या नसल्याचे सांगितले.
>निकालानंतरच भूमिका
मंगळवारी न्यायालयाचा जो निकाल लागेल, त्यानंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू, असे समन्वयक अरविंद मोरे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.