डोंबिवली-पुणे बस आजपासून पुन्हा
By admin | Published: June 13, 2017 03:23 AM2017-06-13T03:23:27+5:302017-06-13T03:23:27+5:30
प्रवासी पुरेसे नसल्याने कारण पुढे करत एसटी महामंडळाने रविवारपासून बंद केलेली डोंबिवली-स्वारगेट बस मंगळवारपासून पुन्हा सुरू होणार आहे. बस परस्पर
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : प्रवासी पुरेसे नसल्याने कारण पुढे करत एसटी महामंडळाने रविवारपासून बंद केलेली डोंबिवली-स्वारगेट बस मंगळवारपासून पुन्हा सुरू होणार आहे. बस परस्पर बंद करण्याच्या एसटीच्या मनमानी कारभाराची गंभीर दखल घेत मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष मनोज घरत यांनी ठाण्याला जाऊन ती पुन्हा सुरु करण्याची मागणी अधिकाऱ्यांकडे केली. ही मंगळवारपासून सुरु करण्याचे तोंडी आश्वासन जिल्हा नियंत्रक अविनाथ पाटील यांनी दिल्याची माहिती घरत यांनी दिली.
प्रवाशांच्या मागणीची दखल घेत एसटीने डोंबिवली-पुणे मार्गावर बस सुरू केली. पण खाजगी बसेस आरामदायी, एसी असताना एसटीने लाल डबा सुरू केली. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी ही बस सुरू करत असल्याची जागृती केली, पण एसटीने त्याबाबत काहीही केले नाही आणि संधी मिळताच प्रवाशांना अंधारात ठेवत बस बंद केल्याचा आरोप, प्रवासी आणि प्रवासी संघटनांनी केला. डोंबिवलीतून पुण्याला जाण्यासाठी खाजगी बसना प्रवासी मिळतात, मग एसटीलाच प्रवासी का मिळत नाहीत? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
महामंडळाने मुंबई-रत्नागिरी ही वातानुकूलीत शिवशाही बस दोन दिवसांपूर्वी सुरु केली. तशीच बस डोंबिवली-पुणे मार्गावर सुुरु का केली नाही, असा मुद्दा घरत यांनी उपस्थित केला. त्यावर पाटील यांनी त्यासाठी महामंडळाकडे प्रस्ताव पाठवावा लागेल. महामंडळाच्या परवानगीनंतरच वातानुकूलित बस सुरु करता येऊ शकते, असे कारण दिले. त्यामुळे आता महामंडळाच्या मुंबईतील मुख्यालयाला भेट देऊन निवेदन देणार असल्याचे घरत यांनी सांगितले.
कोकण प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर शिर्के यांनी प्रवाशांना कोणतीही पूर्वसूचना न देता डोंबिवली-पुणे बस बंद केल्याच्या निर्णयावर टीका केली. याचा जाब त्यांनी विठ्ठलवाडी बस डेपोचे व्यवस्थापक माणिक जुंबळे यांना विचारला. डोंबिवली-पुणे बससाठी तिकीट आरक्षण करुन जाणाऱ्या प्रवाशांचे प्रमाण चांगले होते. कल्याण व डोंबिवली अशा दोन्ही ठिकाणांहून आरक्षण केले जात होते. परतीच्या प्रवासासाठी ९० टक्के प्रवासी मिळत होते. उभे राहून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या किमान १५ इतकी होती. असे असूनही प्रशासनाने मनमानी कारभार केला.
बारमाही बसलाही ठेंगा प्रवासी मिळत नसल्याचे कारण सांगून प्रशासनाने २३ मार्गांवरील बस बंद केल्या. या गाड्या हंगामी (सिझनल) होत्या, असा दावाही प्रशासनाने केला.
२३ मार्गांवरील बस बंद; नियमावर बोट ठेवून निर्णय
महामंडळाच्या ठाणे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात ठाणे एक व दोन असे दोन डेपो आहेत. याशिवाय कल्याण, विठ्ठलवाडी, भिवंडी, शहापूर, मुरबाड, वाडा असे सहा डेपो गृहीत धरता एकूण आठ डेपो जिल्ह्यात आहेत. महामंडळाच्या मुख्यालयाने ६० टक्के प्रवाशांची अट घातली आहे. त्यावर बोट ठेवून अनेक बस बंद केल्या जातात.
बोरिवली-पाचोरा, ठाणे-सातारा, ठाणे-मुरुड, ठाणे-महाड, शहापूर-चाळीसगाव, शहापूर-धुळे, कल्याण-बामनोली, कल्याण-सुपे, भिवंडी-कोल्हापूर, भिवंडी-पोलादपूर, कल्याण-अवसरी, कल्याण-जांबूत, ठाणे-शिंदी, ठाणे-आंबवणे, ठाणे-अंबेजोगाई, विठ्ठलवाडी-शिवाजीनगर, विठ्ठलवाडी-डिंबा, वाडा-अक्कलकुवा, वाडा-अंबेजोगाई आणि भिवंडी-नगर मार्गावरील चार बस गाड्या अशा २३ बस अशीच कारणे देत बंद करण्यात आल्या आहेत. याशिवाय १६ जूनपासून विठ्ठलवाडी-गराटेवाडी ही बस सेवा बंद करण्यात येणार असल्याचे डेपोकडून जाहीर करण्यात आले आहे.