डोंबिवली-पुणे एसटी अखेर झाली सुरू
By Admin | Published: May 16, 2017 12:13 AM2017-05-16T00:13:30+5:302017-05-16T00:13:30+5:30
लोकमत’ आणि मनसेने केलेल्या पाठपुराव्यामुळे विठ्ठलवाडी-डोंबिवली-स्वारगेट एसटी बस सोमवारपासून सुरू झाली. विठ्ठलवाडी आगारातून सुटलेली ही बस सकाळी
डोंबिवली : ‘लोकमत’ आणि मनसेने केलेल्या पाठपुराव्यामुळे विठ्ठलवाडी-डोंबिवली-स्वारगेट एसटी बस सोमवारपासून सुरू झाली. विठ्ठलवाडी आगारातून सुटलेली ही बस सकाळी ७ वाजता पूर्वेतील बाजीप्रभू चौकात येताच ज्येष्ठ नागरिकांनी श्रीफळ वाढवून शुभारंभ केला. या वेळी महिलांनी हिरवा झेंडा दाखवून बस सोडली. याप्रसंगी बसचालक व वाहक यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
‘लोकमत’ने ‘हॅलो ठाणे’ पुरवणीतील ‘आॅन दी स्पॉट’ या सदराद्वारे प्रवाशांच्या डोंबिवली-पुणे एसटी बससेवा सुरू करण्याच्या मागणीवर प्रकाश टाकला होता. मनसेने ही मागणी उचलून धरत एसटीचे ठाणे विभागाचे जिल्हा नियंत्रक अविनाश पाटील यांची भेट घेतली. तेव्हा पाटील यांनी डोंबिवली-पुणे बस सोमवारपासून सुरू करण्याचे आश्वासन दिले. तशी ती सुटली. या प्रसंगी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, शहराध्यक्ष मनोज घरत, महिला आघाडीच्या सुमेधा थत्ते, प्रतिभा पाटील, मनाली पेडणेकर, रवींद्र गरुड, निखिल वायकोडे, दीपक शिंदे, राहुल चितळे, साई प्रसाद जोशी आदी पदाधिकारी उपस्थित होते.
विठ्ठलवाडी- डोंबिवली- स्वारगेट अशी ही बस दररोज सकाळी ७ वाजता बाजीप्रभू चौकातून सुटेल. डोंबिवली-पुणे बसचे भाडे प्रतिप्रवासी १६५ रुपये आहे. ती एमआयडीसी स्थानक-पनवेल-खोपोली-लोणावळा-चिंचवड-स्वारगेट अशी धावणार आहे. स्वारगेटहून-विठ्ठलवाडीकरिता ही बस दुपारी ४ वाजता सुटेल.