डोंबिवलीत राड्यांची ‘शोभायात्रा’, रिपब्लिकन पक्षात जिल्हाध्यक्ष हटवण्याचा वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 06:30 AM2018-03-10T06:30:37+5:302018-03-10T06:30:37+5:30

केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात रिपब्लिकन पक्षाच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास घडली. जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव हे निष्क्रिय ठरले असून, त्यांना हटवावे, या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात रिपाइं युवक आघाडी आणि झोपडपट्टी महासंघाने सभा बोलावली होती.

 Dombivli Rada's 'Shobayatra', in favor of Republican party, to delete the district president | डोंबिवलीत राड्यांची ‘शोभायात्रा’, रिपब्लिकन पक्षात जिल्हाध्यक्ष हटवण्याचा वाद

डोंबिवलीत राड्यांची ‘शोभायात्रा’, रिपब्लिकन पक्षात जिल्हाध्यक्ष हटवण्याचा वाद

Next

डोंबिवली - केडीएमसीच्या डोंबिवली विभागीय कार्यालयात रिपब्लिकन पक्षाच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ च्या सुमारास घडली. जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव हे निष्क्रिय ठरले असून, त्यांना हटवावे, या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात रिपाइं युवक आघाडी आणि झोपडपट्टी महासंघाने सभा बोलावली होती. या वेळी तेथे पोहोचलेल्या जाधव यांनी सभेच्या आयोजकांना मारहाण केली. काही महिलांनाही मारहाण झाल्याने सभागृहातील महिलांनी जाधव यांना बेदम मारहाण केली.
केडीएमसीच्या विभागीय कार्यालयात घेतलेल्या सभेला पक्षाचे वरिष्ठ नेते अण्णासाहेब रोकडे, युवक आघाडीचे संग्राम मोरे, महिला आघाडी जिल्हाध्यक्षा मीना साळवे, जिल्हा सचिव व माजी नगरसेवक भीमराव डोळस आणि झोपडपट्टी महासंघाचे स्थानिक अध्यक्ष माणिक उघडे आदी उपस्थित होते. या सभेपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत जाधव यांना हटवावे, अशी मागणी करण्यात आली. जाधव यांच्या निष्क्रिय कारभारामुळे पक्षाची अधोगती झाली आहे. याबाबत राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना सांगण्यात आले आहे. आठवले यांनी महिनाभरात निर्णय न घेतल्यास नवीन कार्यकारीणी नेमून नवा जिल्हाध्यक्ष जाहीर केला जाईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला.
महापालिकेच्या अर्थसंकल्पात दलित वस्ती सुधारणा किंवा अन्य योजना अंतर्गत एकूण अर्थसंकल्पाच्या टक्केवारीनुसारही (१० टक्के) तरतूद केली जात नसल्याकडे या वेळी लक्ष वेधण्यात आले. डोंबिवली विभागीय कार्यालयाच्या आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा येत्या १४ एप्रिलपूर्वी बसवावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच १६ मार्चला दिल्ली येथे होणाºया पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनासंदर्भात सभेत मार्गदर्शन करण्यात आले.
दरम्यान, सभा सुरू असताना अचानक जाधव तेथे पोहोचले. ‘तुम्हांला सभा घेण्याचा अधिकार कोणी दिला,’ असा त्यांनी आयोजकांना करत मारहाण करण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या प्रकारामुळे सभागृहात एकच गोंधळ उडाला. व्यासपीठावरील डोळस आणि उघडे यांना जाधव यांनी मारहाण केली. या वेळी मध्यस्ती करणाºया महिलांनाही जाधव यांनी मारहाण केली. त्यामुळे महिलांनीही जाधव यांना बेदम मारहाण केली. या हाणामारीची माहिती मिळताच महापालिकेच्या सुरक्षारक्षकांनी सभागृहाच्या दिशेने धाव घेतली. रामनगर पोलिसांनाही बोलवण्यात आले.
सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र वाडेकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह पवार यांनी घटनास्थळी धाव घेत हाणामारी करणाºयांना ताब्यात घेतले. दरम्यान, याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.

कोणालाही मारहाण केलेली नाही

मी २० ते २५ वर्षे जिल्हाध्यक्ष आहे. सोशल मीडियावर काहीजण चुकीची पोस्ट टाकून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. त्याबाबत मी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
जेव्हा एखादा कार्यक्रम करताना शहरातील प्रमुख पदाधिकाºयांना माहिती देणे आवश्यक होते, परंतु त्यांनी कोणतीही विचारणा केली नाही. मी फक्त समजवण्यासाठी गेलो होतो. कोणालाही मारहाण केलेली नाही, अशी प्रतिक्रिया जाधव यांनी दिली.


विनयभंगाची तक्रार देणार
महिलांना मारहाण केल्याप्रकरणी जाधव यांच्याविरोधात आम्ही विनयभंगाची तक्रार करणार असल्याची माहिती महिला जिल्हाध्यक्ष मीना साळवे यांनी दिली.

पक्षातील गटबाजी उघड
या घटनेमुळे रिपाइंतील गटबाजी उघड झाली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले या हाणामारीचा कसा समाचार घेतात, याकडे लक्ष लागले आहे.

Web Title:  Dombivli Rada's 'Shobayatra', in favor of Republican party, to delete the district president

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे