डोंबिवली स्थानकात अवतरली पंढरी

By admin | Published: July 5, 2017 06:05 AM2017-07-05T06:05:40+5:302017-07-05T06:05:40+5:30

आषाढी एकादशीला पंढरीची वारी करण्याची अनेकांची मनीषा विविध कारणांमुळे पूर्ण होत नाही. अशा भाविकांसाठी मंगळवारी हरिओम

Dombivli railway station | डोंबिवली स्थानकात अवतरली पंढरी

डोंबिवली स्थानकात अवतरली पंढरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : आषाढी एकादशीला पंढरीची वारी करण्याची अनेकांची मनीषा विविध कारणांमुळे पूर्ण होत नाही. अशा भाविकांसाठी मंगळवारी हरिओम रेल्वे प्रवासी मंडळ, दिवा-डोंबिवली यांच्यातर्फे डोंबिवली रेल्वे स्थानकात आषाढी सोहळ््याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे डोंबिवली स्थानकात अवघे पंढरपूर अवतरले होते.
नोकरी-व्यवसायानिमित्त मुंबईला प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनी लोकलमध्ये भजनी मंडळे सुरू केली आहेत. सकाळी ९.०६ मिनिटांनी डोंबिवलीहून सीएसटीकरता सुटणाऱ्या लोकलमधील काही प्रवाशांचे हरिओम रेल्वे प्रवासी मंडळ आहे. या मंडळातर्फे दररोज प्रवासादरम्यान भजने, कीर्तन, अभंग सादर केली जातात.
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येक भक्ताला पंढरपूरला जाता येताच असे नाही. अशा भाविकांसाठी पंढरपूरच येथे अवतरले तर त्यांनाही विठूचे दर्शन घेता येईल, अशी संकल्पना पाच वर्षांपूर्वी मंडळातील सदस्यांना सूचली. या मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही संकल्पना अंमलातही आणली. डोंबिवलीतील फलाटक्रमांक १ च्या बाजूला विठ्ठलच्या मूर्ती ठेवण्यात आली. उत्तम शिंदे, संतोष खानविलकर आदींनी तिला तुळशीची पाने-फुलांनी आकर्षक सजावट केली. मंगळवारी पहाटे ५ वाजता राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. तर सायंकाळी आरती झाली.
या सोहळ््यात ३० मंडळांनी विविध प्रकारची भजने सादर केली. ‘विठ्ठल आवडे,’ ‘अवघे गर्जा पंढरपूर,’ ‘पर्णपांचोळू सावळा सावळा,’ ‘माझे माहेर पंढरी’ अशी विठ्ठलाची भजने सादर करण्यात आली. महिलांच्या पथकांनी नाट्यपदे सादर केली.
हरिओम रेल्वे प्रवासी मंडळ दरवर्षी एक थीम घेऊन हा कार्यक्रम केला जातो. यावर्षी स्वच्छता व पर्यावरण ही थीम घेतली होती. रेल्वे परिसर स्वच्छ ठेवा, कुठेही घाण करू नका. हाच संदेश मंगळवारी या कार्यक्रमातून देण्यात आला.
दरम्यान, या सोहळ््याची तयारी दोन दिवसांपासून सुरू होती. सोहळा यशस्वी करण्यासाठी राजेंद्र टेमेकर, रवींद्र टेमेकर, संतोष पाठक, विरेंद्र लाड, संदेश सुर्वे, कृष्णा सावंत, विठ्ठल शेलार, शिवाजी देसाई यांनी विशेष परिश्रम घेतले.

शहाड येथे भाविकांची गर्दी
बिर्लागेट : शहाड येथील सुप्रसिद्ध बिर्ला मंदिरात मंगळवारी सकाळी आमदार नरेंद्र पवार यांच्या हस्ते व सेंच्युरी रेयॉन कंपनीचे व्यवस्थापक ओ. आर. चिंतलागे यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजा करण्यात आली. त्यानंतर भाविकांना मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. कल्याण ग्रामीण परिसरातील २० ते २५ गावांतील भाविकांनी या मंदिरापर्यंत पायी दिंड्या काढल्या होत्या. मंदिर परिसरात जत्रा भरली होती. त्यात खेळणे, पाळणे व दुकाने सजली होती.

हरिनामाचा जयघोष
टिटवाळा : शहरातील विठ्ठल मंदिरातही मंगळवारी मोठ्या उत्साहात आषाढी एकादशी साजरी झाली. विविध गावांतील वारकरी दिंड्या घेऊन या मंदिरात आले होते. यंदाही उशिद ते टिटवाळा आणि पुढे शहाड येथील बिर्ला मंदिर अशी ४० किलोमीटरची दिंडी काढण्यात आली. वारकऱ्यांनी भजन, कीर्तने सादर केली, अशी माहिती कीर्तनकार पं. महाराज लोणे यांनी दिली.

टटवाळ््यातील विठ्ठल मंदिरापर्यंत संकल्प प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय देशेकर यांनी दिंडी काढली. त्यात ‘बेटी बचाब,’‘ झाडे लावा झाडे जगवा,’ ‘ओला कचरा वेगळा करा...सुका कचरा वेगळा करा’ आदी घोषणा दिंडीत सहभागी झालेल्यांनी दिल्या. ‘रिजन्सी’तर्फे ही दिंडी निघाली. विठ्ठल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले, अशी माहिती विश्वस्त दादा खिस्मतराव दिली.

Web Title: Dombivli railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.