डोंबिवलीत रिक्षा महागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 02:52 AM2018-07-25T02:52:23+5:302018-07-25T02:52:47+5:30

आरटीओ, रिक्षा संघटनांची बैठक : उद्या होणार संयुक्त पाहणी; किमान २ रुपये वाढ?

Dombivli rickshaw will be expensive | डोंबिवलीत रिक्षा महागणार

डोंबिवलीत रिक्षा महागणार

Next

डोंबिवली : पश्चिमेतील सुभाष रोड आणि परिसरात शेअर पद्धतीने धावणाऱ्या रिक्षाचालकांनी काही दिवसांपासून प्रवाशांकडून प्रतिसीट आठ रुपयांऐवजी दहा रुपये भाडे आकारण्यास सुरुवात केली होती. मात्र, ही भाडेवाढ बेकायदा असल्याने प्रवाशांनी वाढीव भाडे द्यावे की नाही, यासाठी कल्याण आरटीओ कार्यालयात मंगळवारी बैठक झाली. या वेळी २०१४ पासून कोणतीही भाडेवाढ केलेली नाही. त्यामुळे आता भाडेवाढ द्यावी, अशी मागणी या वेळी रिक्षा संघटनांनी केली.
दरम्यान, भाडेवाढ अटळ असल्याचे संकेत आरटीओ अधिकाºयांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये डोंबिवलीत रिक्षा प्रवास महागणार आहे.
पश्चिमेतील सुभाष रोड परिसरातून कुंभारखाण पाडा, चिंचोड्याचा पाडा आदी भागात जाण्यासाठी आठ रुपये शेअर पद्धतीने घेतले जात होते, पण काही रिक्षाचालकांनी अचानकपणे १० रुपये भाडे आकारण्यास सुरुवात केली. त्यामुळे नेमके किती भाडे द्यायचे, या वरून रिक्षाचालक आणि प्रवासी यांच्यात संघर्ष सुरू होता. कल्याण आरटीओ अधिकारी संजय ससाणे यांनी त्याची दखल घेत मंगळवारी बैठक बोलावली होती. यावेळी कल्याण-डोंबिवली परिसरातील रिक्षा संघटनांचे प्रकाश पेणकर, शेखर जोशी, काळू कोमास्कर, दत्ता माळेकर, अंकुश म्हात्रे, भिकाजी झाडे, रामा काकडे, संजय मांजरेकर, संतोष नवले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
पेणकर यांनी कल्याण परिसरातील रिक्षाचालकांची व्यथा मांडली. हकीम समितीने दरवर्षी किमान एक रुपया भाडेवाढ करावी, अशी शिफारस केली होती; पण डोंबिवली शहर परिसरात २०१४ पासून भाडेवाढ झालेली नाही. त्यामुळे आता भाडेवाढ द्यावी, आणि ती नियमानुसार द्यावी, जेणेकरून प्रवाशांच्या रोषाला रिक्षाचालकांना सामोरे जावे लागणार नाही. त्यासाठी आरटीओनेच दरपत्रक ठिकठिकाणी लावावे आणि दर जाहीर करावेत, अशी मागणी पेणकर यांनी यावेळी केली.
दरवाढ जरी रिक्षाचालकांनी केलेली नसली तरीही चौथी सीट भरून ते भाडेवसूल केले जात असल्याचाही मुद्दा बैठकीदरम्यान चर्चेत आला होता. त्यावर मात्र संघटनांच्या पदाधिकाºयांनी आळीमिळी गुपचिळीचे धोरण स्वीकारत बोलणे टाळले. त्या सोबतच जर डोंबिवलीहून काटईला जाण्यासाठी जर ४० रुपये घेणे अपेक्षित असले तरी आता केवळ २५ रुपयेच आकारण्यात येत असल्याची बाब माळेकर यांनी ससाणे यांच्या निदर्शनास आणून दिली.
त्यानुसार आरटीओ अधिकारी, रिक्षा आणि प्रवासी संघटनांचे पदाधिकारी यांचा संयुक्त पाहणी दौरा गुरुवारी करण्यात येणार असल्याची माहिती ससाणे यांनी दिली. त्या पाहणीनंतर किती दरवाढ द्यायची? कोणत्या मार्गावर द्यायची, कुठे नाही यासंदर्भात देखिल चर्चा करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. ती पाहणी केल्यावर ठाण्याच्या वरिष्ठांकडे तसेच एमएमआरटीएकडे संघटनांच्या दरवाढीसह अन्य मागण्यांचा प्रस्ताव पाठवण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.
कल्याणमधील खड्डे आणि वाहतूककोंडीमुळे रिक्षाचालक त्रस्त असून त्यांनी गर्दीच्या वेळेत चार तास रिक्षा न चालवण्याचा निर्णय घेतला होता. त्यावर झालेल्या चर्चेत पालकमंत्री एकनाथ शिंदे, महापालिका आयुक्त गोविंद बोडके आदी हजर होते.

भाडेवाढ करू नका- चव्हाण
राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी ससाणे यांच्याशी भाडेवाढ न करण्यासंदर्भात चर्चा केली होती. शहरातील बहुतांश रिक्षा सीएनजी चालत आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलसारखा खर्च रिक्षाचालकांना होत नसल्याचे, ते म्हणाले होते.
रिक्षाचालकांसह संघटनांची मागणी रास्त असली तरीही प्रवाशांच्या हिताचा विचार करावा आणि शक्यतोवर भाडेवाढ करू नये, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. तसेच यासंदर्भात रिक्षासंघटनांशी चर्चा करून योग्य तो पर्याय काढण्यासंदर्भात तयारी दर्शवल्याचे सांगण्यात आले.

Web Title: Dombivli rickshaw will be expensive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.