डोंबिवलीने भाजपाला तारले : ३८ पैकी २० जागांवर कमळ
By admin | Published: November 3, 2015 01:10 AM2015-11-03T01:10:07+5:302015-11-03T01:10:07+5:30
केडीएमसीच्या निवडणुकीत भाजप गेल्या वेळेपेक्षा चारपट वाढली. गेल्यावेळी डोंबिवलीतून जेमतेम ८ नगरसेवक येथून विजयी झाले होते, यावेळेस डोंबिवली पूर्व-पश्चिम मिळून एकूण
- अनिकेत घमंडी, डोंबिवली
केडीएमसीच्या निवडणुकीत भाजप गेल्या वेळेपेक्षा चारपट वाढली. गेल्यावेळी डोंबिवलीतून जेमतेम ८ नगरसेवक येथून विजयी झाले होते, यावेळेस डोंबिवली पूर्व-पश्चिम मिळून एकूण ३८ जागांपैकी २० जागांवर भाजपाला यश मिळाल्याने डोंबिवलीनेच भाजपाला तारले, असे बोलले जात आहे.
डोंबिवली पूर्वेकडील वीस जागांपैकी १४ जागांवर कमळ फुलल्याने या मतदारसंघाचे आमदार रवींद्र चव्हाण तसेच पूर्व मंडल अध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या बांधणी व संघटन कौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पूर्वेकडे खंबाळपाडा- शिवाजी शेलार (बिनविरोध), प्रमिला चौधरी- चोळेगाव, मंदार टावरे(आयरेगाव), विशु पेडणेकर (म्हात्रे नगर), विश्वदिप पवार ( शिव मार्केट), संदिप पुराणीक ( सावरकर रोड), राहुल दामले ( पेंडसे नगर), खुशबु चौधरी ( सारस्वत कॉलनी), निलेश म्हात्रे ( पाथर्ली), नितीन पाटील ( तुकाराम नगर), कविता म्हात्रे ( सुनिल नगर), राजन आबाळे (टिळकनगर), महेश पाटील (अंबिका नगर), सायली विचारे, धात्रक दाम्पत्य, विकास म्हात्रे दाम्पत्य, यांसह विद्या म्हात्रे तसेच अन्य एक सहयोगी अपक्ष (नांदिवली) आदींनी निवडणुक जिंकली.
आयरेगावातील टावरेंनी विजयश्री खेचून आणताना आधी काँग्रेस आणि आता शिवसेनेच्या गोटातून उमेदवारी मिळालेल्या रवी पाटील यांचा हजाराहून अधिक मतांनी पराभव केला. त्यामुळे ते जायंट किलर ठरल्याची चर्चा आहे.
डोंबिवली पूर्वेतूनच आमदार चव्हाण यांना विधानसभेला प्रचंड मतदान झाले होते. त्यावेळीही पूर्वेच्या १२ वॉर्डात मतदान सर्वाधिक झाले होते. सुमारे ४४ हजाराहून अधिक मते त्यांना मिळाली होती. गेले वर्षभर सर्व आव्हाने बाजुला सारत स्थानिक संघटनेने कार्यकर्त्यांची पकड, संघटना कौशल्य जोपासत वातावरण निर्मिती कायम ठेवली. परिणामी पश्चिमेच्या तुलनेत या ठिकाणी सर्वाधिक मते प्राप्त झाली, आणि उमेदवारही निवडून आले.
रवींद्र चव्हाण यांना डोंबिवलीतून संघाची साथ मिळाल्यानेच हे यश प्राप्त झाले. संघाची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्र्यांना यश आले. त्यामुळेच डोंबिवली स्तरावर परिवार पाठीशी उभा राहील्यानेच या आकडेवारीपर्यंत भाजपाला जाता आले.
निश्चितच हे यश भाजप कार्यकर्त्यांसह मतदारांचे आहे. संघानेही नेहमीच सहकार्याची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळेच डोंबिवलीत कमळच फुलले याचा निश्चितच आनंद आहे . सत्तेत कसे जायचे याचा निर्णय सर्वस्वी पक्षश्रेष्ठी घेतील.
- रवींद्र चव्हाण, आमदार