डोंबिवलीत शेअर रिक्षांचा लांबचा प्रवास महागल्याने प्रवाशांमध्ये संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 11:27 PM2019-02-25T23:27:19+5:302019-02-25T23:27:21+5:30
भाड्यात ८ ते १५ रुपयांची वाढ : आरटीओ अधिकाऱ्यांना प्रवासी, रिक्षाचालकांचा घेराव, रिक्षाभाड्याचे दरपत्रक लावले
डोंबिवली : शहरातील लालबावटा रिक्षा युनियनने आरटीओची परवानगी नसतानाही शेअर रिक्षा भाडेवाढीचा फलक लावून त्यानुसार भाडेआकारणी सुरू केली होती. याबाबत रिक्षाचालकांवर कारवाई होत नसल्याची टीका प्रवाशांनी केल्याने अखेर सोमवारी सायंकाळी आरटीओ अधिकाऱ्यांनी २०१५ च्या महागाई निर्देशांकानुसार शेअर रिक्षाभाडे आकारणीचे दरपत्रक लावले आहे. त्यानुसार, शेअर रिक्षाचे जवळच्या अंतराचे भाडे आठ रुपये कायम राहिले आहे. मात्र, लांबचा प्रवास हा ८ ते १५ रुपयांपर्यंत महागला आहे. त्यामुळे प्रवासी संतप्त झाले आहेत. दुसरीकडे इंदिरा गांधी चौकात प्रवासी व रिक्षाचालकांनी आरटीओ अधिकाऱ्यांना घेराव घालत हे दरपत्रक पेट्रोलचे की सीएनजी रिक्षांचे, हे आधी स्पष्ट करा, अशी मागणी केली.
भाडेवाढ करणे, अथवा सुधारित दरपत्रक लावण्याचा अधिकार आरटीओला आहे. मात्र, त्याआधीच रिक्षा युनियनने भाडेदरवाढीचे फलक लावल्यानेही प्रवाशांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे आरटीओने लालबावटा रिक्षा युनियनच्या पदाधिकाºयांना नोटीस बजावली होती. तसेच वाहतूक नियंत्रण शाखेच्या अधिकाºयांच्या दालनात पंधरवड्यापूर्वी बैठक झाली होती. त्यावेळी आरटीओ रिक्षाभाड्याचे फलक लावेल, असे ठरले होते. मात्र, तोपर्यंत युनियनने फलक काढावेत, अशी सूचना त्यांना केली होती. प्रत्यक्षात युनियनचे फलक काढलेले नव्हते. त्यामुळे आरटीओची नोटीस ही वरवरची कारवाई असल्याची चर्चा होती.
आरटीओने सोमवारी रात्री इंदिरा गांधी चौक आणि रामनगर येथे दरपत्रकांचे फलक लावले. सूत्रांच्या माहितीनुसार १९ फलक लावले जाणार आहेत. हकीम खटाव समितीच्या महागाई निर्देशांकानुसार हे दरपत्रक २०१५ मध्ये आरटीओने तयार केले होते. मात्र, त्याची या ठिकाणी अंमलबजावणी झालेली नव्हती, ती आता होत असल्याने आमची मागणी पूर्ण झाल्याची प्रतिक्रिया लालबावटा रिक्षा युनियनचे अध्यक्ष काळू कोमास्कर यांनी दिली.
प्रवाशांना नाहक भुर्दंड
डोंबिवली रेल्वेस्थानक ते लोढा परिसरात जाण्यासाठी सध्या शेअर रिक्षाचे भाडे २५ रुपये होते. ते आता ४० रुपये झाले आहे. डोंबिवली स्थानकाहून पत्रीपुलासाठी २४ रुपये द्यावे लागत होते, ते आता ३२ रुपये द्यावे लागणार आहे. अशा पद्धतीने सुमारे १५ रुपयांपर्यंतची वाढ झाली असून त्याचा भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागणार आहे.
रिक्षा युनियनच्या मागणीनुसार २०१५ चे दरपत्रक सोमवारी डोंबिवलीत लावले असून ते सीएनजी रिक्षांसाठीचेच आहे. तसेच या दरपत्रकांमुळे जवळच्या प्रवासापेक्षा लांबचा प्रवास महागला आहे.
- संजय ससाणे, उपप्रादेशिक परिवहन (आरटीओ) अधिकारी, कल्याण
प्रवाशांमध्ये संभ्रम निर्माण होत आहे. दरपत्रकांमुळे काहीही स्पष्ट होत नाही. रिक्षाचालक प्रामुख्याने अमराठी आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी वादविवाद होत असून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. आरटीओने जरी फलक लावलेले असले, तरी यापुढे काही दिवस होणारा गोंधळ सोडवावा.
- सागर घोणे, प्रवासी संघटनेचे कार्यकर्ते