डोंबिवलीत पाण्याच्या मीटरची राजरोस चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 02:10 AM2018-05-01T02:10:55+5:302018-05-01T02:10:55+5:30
घरफोडी आणि सोनसाखळीचोरीच्या घटना शहरात घडत असताना केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाने सोसायट्यांमध्ये लावलेले पाण्याचे मीटरही मोठ्या प्रमाणावर चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत.
डोंबिवली : घरफोडी आणि सोनसाखळीचोरीच्या घटना शहरात घडत असताना केडीएमसीच्या पाणीपुरवठा विभागाने सोसायट्यांमध्ये लावलेले पाण्याचे मीटरही मोठ्या प्रमाणावर चोरीला गेल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. महिनाभरात ५० ते ६० मीटर चोरीला गेल्याची नोंद महापालिका दफ्तरी करण्यात आली आहे. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यांमध्ये नागरिकांनी तक्रारअर्ज देऊनही मीटरचोरांचा थांगपत्ता लागलेला नाही. मुख्य म्हणजे पोलीस एफआयआर दाखल करून घेत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच नवीन मीटरच्या खर्चाचा भुर्दंड आणि मीटर नसल्याने जादा बिले येण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.
डोंबिवली पूर्वेतील गोग्रासवाडी, पेंडसेनगर, सारस्वत कॉलनी, खंबाळपाडा, बाबासाहेब जोशी मार्ग, राजाजी पथ या प्रमुख ठिकाणांसह बहुतांश ठिकाणच्या सोसायट्यांमधील पाण्याचे मीटर चोरीला गेले आहेत. पश्चिमेतही या चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. सहा महिन्यांत २५३ पाणीमीटर चोरीला गेली आहेत. या घटनांप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल झाल्या आहेत.
राजाजी पथावरील नंदादीप, शिवम कॉम्प्लेक्स, स्मृती जनार्दन, सुरज, आर्यभट्ट, दिनकर, कांचन, मल्हार या सोसायट्यांमधील पाण्याचे मीटर चोरीला गेले आहेत. राजाजी पथ परिसरात २० एप्रिलच्या मध्यरात्री ३० ते ४० मीटर चोरीला गेल्याची माहिती दिनकर बिल्डिंगमधील रहिवासी हेमंत ताम्हणे यांनी दिली. या वाढत्या घटना पाहता या चोरीच्या घटनांमागे एखादे रॅकेट तर नाही ना, अशी शंका स्थानिक नगरसेवक आणि केडीएमसीचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी व्यक्त केली.
महापालिकेच्या ‘ग’ प्रभागात एप्रिलमध्ये २९ मीटर, तर ‘फ’ प्रभागात चार मीटर चोरीला गेल्याचे अर्ज आल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले. डोंबिवलीत चोरीच्या घटना गेल्या सहा ते सात महिन्यांपासून सुरू आहेत, पण अद्याप या मीटरचोरीच्या घटनांचा छडा लावण्यात स्थानिक पोलिसांना यश आलेले नाही. महापालिकेने त्या सोसायट्यांमध्ये नव्याने मीटरही बसवलेले नाहीत. यासंदर्भात ‘लोकमत’ने पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला असता मीटर चोरीला गेल्याने नवीन मीटर बसवण्याबाबत संबंधितांचे अर्ज पालिकेकडे आले आहेत. त्याप्रमाणे कार्यवाही सुरू आहे. मीटर चोरीला गेल्याने सध्या पाण्याचे मोजमाप होत नसले, तरी त्यांना भरमसाट बिले पाठवली जाणार नाहीत. नवीन मीटर लावल्यानंतरच मोजमाप होईल, असा दावा त्या विभागाकडून करण्यात आला आहे.
एफआयआर नोंदवण्यास टाळाटाळ
मीटर चोरीला गेल्याने संबंधित सोसायट्यांमधील सध्या किती प्रमाणात पाणी वापरले जाते, याची मोजदादच होत नाही. त्यामुळे केडीएमसीकडून भरमसाट पाण्याची बिले आकारण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे राजाजी पथावरील नंदादीप सोसायटीतील रहिवासी संदीप पाटील यांनी सांगितले. त्याचबरोबर तक्रार अर्ज घेताना पोलिसांकडून एफआयआर नोंदवून घेत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.