डोंबिवलीत रंगली महिलांच्या कुस्त्यांची ‘दंगल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 02:38 AM2018-04-10T02:38:05+5:302018-04-10T02:38:05+5:30
मराठमोळ्या मातीतील कुस्तीचे मैदान दोन वर्षांपासून महिलाही मारू लागल्या आहेत. पश्चिमेतील मोठागाव येथे गावदेवीमातेच्या जत्रेनिमित्त रविवारी झालेल्या कुस्त्यांच्या सामन्यात राष्ट्रीय खेळाडू सरोज पवार हिने बाजी मारली.
डोंबिवली : मराठमोळ्या मातीतील कुस्तीचे मैदान दोन वर्षांपासून महिलाही मारू लागल्या आहेत. पश्चिमेतील मोठागाव येथे गावदेवीमातेच्या जत्रेनिमित्त रविवारी झालेल्या कुस्त्यांच्या सामन्यात राष्ट्रीय खेळाडू सरोज पवार हिने बाजी मारली. मात्र, महिलांना कुस्तीपटू सरकारकडून फारशी मदत मिळत नसल्याची खंत तिने या वेळी व्यक्त केली.
मोठागाव, देवीचापाडा येथील जत्रेत गावदेवी मंदिर संस्थानतर्फे मातीतील कुस्त्यांची स्पर्धा घेण्यात आली. महिला आणि दिव्यांग कुस्तीगीरांचे सामने हे त्यातील प्रमुख आकर्षण होते. हे सामने पाहण्यास कुस्तीप्रेमींनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. या स्पर्धेत सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, कल्याण, डोंबिवली आदी ठिकाणांहून अंदाजे ३०० ते ३५० पुरुष व महिला मल्ल सहभागी झाले होते. या मल्लांनी आपले कौशल्य यावेळी दाखवले. त्यांच्या थरारक खेळाने प्रेरित होऊन नवीन पिढी या खेळाकडे वळेल, असा विश्वास आयोजक पुंडलिक म्हात्रे यांनी व्यक्त केला. खेळाडूंनी मातीशी जुळवून घेण्यासाठी हे सामने मातीच्या आखाड्यात घेण्यात आले. गावाची ही परंपरा यापुढे जपली जाईल, असे दीपेश म्हात्रे यांनी सांगितले.
महिलांच्या चुरशीच्या ठरलेल्या लढतीत सरोज पवार हिने कल्याणच्या भाग्यश्री गडकरला चितपट केले. तिला पाच हजार ५५५ रुपयांचे रोख पारितोषिक आणि चषकाने गौरवण्यात आले. देवीचापाडा येथील स्थानिक मल्ल अक्षय भोईर यांनी चांगले डावपेच करून कोल्हापूरच्या राज माने यास आसमान दाखवले.
सरोज सायनला राहत असून प्रथम वर्ष वाणिज्य शाखेत शिकत आहे. ठाण्यातील गावदेवी मैदानात ती कुस्तीचे धडे गिरवत आहे. महिला कुस्तीला पूर्वी फार प्राधान्य नव्हते. पण, दोन वर्षांत हे चित्र बदलले आहे. बारावीला असताना मी राज्यस्तरावर खेळले. त्यानंतर, स्पर्धांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग घेत आहे. पूर्वी महिलांच्या स्पर्धाही अटीतटीच्या होत नव्हत्या. आता विजयी होण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते, असे तिने सांगितले.
सरोजचे प्रशिक्षक प्रेमचंद्र अकोले म्हणाले, मुलींना कुस्ती खेळण्यासाठी महिन्याला अंदाजे १० हजार रुपयांचा खर्च येतो. आॅलिम्पिक स्पर्धांपासून कुस्तीमध्ये महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होऊ लागल्या आहेत. या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या मुलींनी मॅटवर कुस्ती खेळली पाहिजे. मॅटवरील कुस्तीसाठी स्टॅमिना जास्त लागतो. लोकप्रतिनिधींनी कुस्तीपटूंना आर्थिक साहाय्य केल्यास या खेळालाही चांगले दिवस येतील, असे त्यांनी सांगितले.
>दर्शनासाठी भाविकांची गर्दी
मोठागाव येथील गावदेवी-व्याघ्रदेवीच्या यात्रेस शनिवारी सकाळी प्रारंभ झाला. यावेळी देवीची ओटी भरणे व दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविकांनी गर्दी केली होती.
देवीमातेची पूर्जाअर्चा सचिन म्हात्रे, नानी म्हात्रे व बंडू भगत (पुजारी) यांनी केली. सायंकाळी दीपेश म्हात्रे यांच्या हस्ते देवीची पूजा झाल्यानंतर पालखी मिरवणूक निघाली.
गावदेवीचा उत्सव यशस्वी व्हावा, यासाठी संस्थानचे सर्व विश्वस्त व मोठागाव, देवीचापाडाचे ग्रामस्थ यांनी अध्यक्ष पुंडलिक म्हात्रे व शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली मेहनत घेतली.