डोंबिवलीत शिवसेनेचे नेते, ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदेंचा शनिवारी नागरी सत्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2018 06:18 PM2018-01-31T18:18:48+5:302018-01-31T18:19:12+5:30
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्याने शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी डोंबिवलीनजीकच्या प्रिमियर मैदानावर नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे.
डोंबिवली: पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदी निवड झाल्याने शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने शनिवारी ३ फेब्रुवारी रोजी डोंबिवलीनजीकच्या प्रिमियर मैदानावर नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ज्येष्ठ साहित्यिक मधुमंगेश कर्णिक यांच्यासह अन्य आठ मान्यवर मंडळीच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांनी ‘लोकमत’ला दिली.
खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, आमदार सुभाष भोईर, ठाणे, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, उल्हासनगर, शहापूर, भिवंडी आदी भागातील पक्षाच्या प्रमुख पदाधिका-यांनी तो उपक्रम यशस्वी होण्यासाठी कंबर कसली आहे. शनिवारी संध्याकाळी ५ वाजता सत्कार ठेवण्यात आला असून पालकमंत्री शिंदे यांच्या कार्यकर्ता ते पालकमंत्री हा प्रवास, तसेच राजकीय वाटचालीचा आढावा घेण्यात येणार आहे. पालकमंत्र्यांना चांदीची तलवार, मानपत्र यासह विविध सन्मानपत्र देऊन सन्मानीत करण्यात येणार आहे. ठाणे शहरातील पक्षाचे नेते, तसेच खासदार श्रीकांत शिंदेसह पक्षातील मान्यवर नेते, पदाधिकारी जिल्ह्यासह महाराष्ट्रातील विविध प्रतिष्ठीत मंडळींशी स्वत:हून चर्चा करत असून सोहळयाला आवर्जुन येण्यासाठी आवाहन करत आहेत. न भुतो असा सोहळा करण्यासाठी सर्वच शिवसैनिक पदाधिका-यांसह कार्यकर्त्यांनी चंग बांधला असून पालकमंत्र्यांचा सोहळा जंगी करायचा असा मनसुबा बांधण्यात आला आहे.
डोंबिवलीनजीक हा सोहळा संपन्न होणार असल्याने या परिसरातील राजकीय समीकरणांबद्दल सर्वपक्षांमध्ये तर्क वितर्कांना उधाण आले आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे सर्वपक्षांमधील नेत्यांशी सौहार्दपूर्ण स्नेह असल्याचे सर्वश्रुत असल्याने शनिवारच्या सोहळयाला प्रचंड गर्दी होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यासाठी रचनेनूसार नियोजन करण्यात येत असून समाजामधील विविध संस्था, मान्यवर नागरिकांना त्यासाठी आमंत्रित करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने डोंबिवलीच्या शिवसैनिक पदाधिका-यांवर सर्वाधिक जबाबदारी असून कल्याण, २७ गावांमधील पक्षाचे नेते, कार्यकर्ते कामाला लागले आहेत. प्रिमियर मैदानावर सध्या कै. रतन पाटील स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा रंगल्या असून त्याचा समारोप दोन दिवस आधी झाल्यावर लगेचच शनिवारी तेथे पालकमंत्र्यांचा सत्कार सोहळा रंगणार असल्याचे शिवसैनिकांनी सांगितले.