धोरणच नसल्याने डोंबिवलीकर वेठीला! सांस्कृतिक उपराजधानीला ठिकठिकाणच्या ‘कोंडी’ची अवकळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2018 02:24 AM2018-01-08T02:24:31+5:302018-01-08T02:25:21+5:30

पुण्याला जशी सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे, तशीच सांस्कृतिक परंपरा जपणा-या डोंबिवलीची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून ओळख आहे. परंतु, येथील सत्ताधा-यांची बोटचेपी भूमिका आणि स्थानिक केडीएमसी प्रशासनाचा भोंगळ कारभार याचा फटका एकंदरीतच येथील सार्वजनिक व्यवस्थेला बसला आहे.

Dombivlikar sittila due to lack of policy! The cultural dilemma of 'Kandi' | धोरणच नसल्याने डोंबिवलीकर वेठीला! सांस्कृतिक उपराजधानीला ठिकठिकाणच्या ‘कोंडी’ची अवकळा

धोरणच नसल्याने डोंबिवलीकर वेठीला! सांस्कृतिक उपराजधानीला ठिकठिकाणच्या ‘कोंडी’ची अवकळा

Next

पुण्याला जशी सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे, तशीच सांस्कृतिक परंपरा जपणा-या डोंबिवलीची सांस्कृतिक उपराजधानी म्हणून ओळख आहे. परंतु, येथील सत्ताधा-यांची बोटचेपी भूमिका आणि स्थानिक केडीएमसी प्रशासनाचा भोंगळ कारभार याचा फटका एकंदरीतच येथील सार्वजनिक व्यवस्थेला बसला आहे. यात बेकायदा रिक्षातळाचा पडलेला विळखा, फेरीवाल्यांचे अतिक्रमण यात रेल्वेस्थानक परिसराला एक प्रकारे अवकळा आली आहे. यामध्ये वाहतुकीचादेखील बो-या वाजत असल्याने सांस्कृतिक उपराजधानीत कोंडीची समस्या कायम राहून नागरिक वेठीस धरला जात असल्याचे वास्तव आहे.
वाढते शहरीकरण, मोठ्या प्रमाणावर वाढलेली वाहनांची संख्या, कृतीअभावी सिग्नल यंत्रणेचा उडालेला बोजवारा, चौक तिथे रिक्षातळ, बेकायदा पार्किंग, त्यातच सुरू असलेली काँक्रिटीकरणाची कामे. परिणामी, या ठिकाणी वाहतूकव्यवस्थेचा खेळखंडोबा सातत्याने होतो. शहराचा एकंदरीतच विचार करता मानपाडा, चाररस्ता याठिकाणी काही वर्षांपूर्वी सिग्नल यंत्रणा होती. परंतु, आता शहरात कुठेही सिग्नल यंत्रणा कार्यान्वित नाही. पूर्वेकडील मानपाडा रस्त्याबरोबरच इंदिरा गांधी चौक, बाजीप्रभू चौक, टिळक चौक, आयरे रोड तर पश्चिमेकडील सम्राट चौक, दीनदयाळ रोड, गुप्ते रोड, महात्मा फुले रोड, महात्मा गांधी रोड, कोपर रोड या ठिकाणच्या महत्त्वाच्या भागांमध्ये सकाळसायंकाळ वाहतूककोंडीचा सामना डोंबिवलीकरांना करावा लागतो. सर्वाधिक फटका रेल्वेस्थानक परिसराला बसतोय. या ठिकाणी होणारे फेरीवाल्यांचे अतिक्रमण त्याचबरोबर ‘चौक तेथे रिक्षातळ’ यात केडीएमटीच्या बसचे होणारे पार्किंगही एकप्रकारे कोंडीला हातभार लावत आहे. एल्फिन्स्टन दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मनसेने छेडलेले आंदोलन आणि उच्च न्यायालयाने रेल्वेस्थानक परिसर फेरीवालामुक्त होण्यासाठी घातलेले १५० मीटर अंतराचे बंधन यामध्ये काही दिवस स्थानक परिसराने मोकळा श्वास घेतला होता. त्या वेळी परिसर फेरीवालामुक्त होण्यास मदत झाली खरी, परंतु बेकायदा रिक्षातळाचा विळखा कायम राहिल्याने फेरीवाल्यांना लक्ष्मणरेषेचे बंधन, तर रिक्षाचालकांना मुक्त अंगण अशी काहीशी स्थिती होती.
डोंबिवली पूर्व-पश्चिम भागाचा आढावा घेता तब्बल १५ रिक्षातळ स्थानक परिसरात आहेत. यातील बहुतांश तळ बेकायदा आहेत. यामुळे स्थानक परिसराला बकालपणा आला आहे. डोंबिवलीकरांना वाहन पार्किंगची समस्याही चांगलीच भेडसावत आहे. त्यामुळे रेल्वेस्थानक परिसर आणि बाजारपेठा परिसरातील मार्गांवर वाहने पार्क करावी लागतात. पार्किंगची सुविधा नसल्याने बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी येणाºया तसेच अन्य कामांसाठी येणाºयांना आपले वाहन कुठे पार्क करायचे, असा प्रश्न पडतो. दरम्यान, बाजीप्रभू चौकातील प्रस्तावित वाहनतळाचे काम पूर्ण झालेले आहे. येथील व्यवस्थेसाठी निविदा प्रक्रियाही पार पडलेली आहे. परंतु, पुढे कार्यवाही पार पडलेली नाही. परिणामी, वाहन पार्किंगची समस्या जैसे थे आहे.
केडीएमसीची प्रभावशून्य कारवाई आणि फेरीवाला संघटनांचे राजकीय पक्षांशी असलेले साटेलोटे यात परिस्थिती जैसे थे राहिल्याने स्थानक परिसरातील चित्र आजघडीलाही विदारक असेच आहे. पूर्वेला रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांचे वाढते अतिक्रमण पाहता तेथून केडीएमटीच्या बस सोडण्याचे आदेश महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांनी दिले होते. त्यानुसार, तीन नवीन मार्गांवर बसही सुरू करण्यात आल्या. परंतु, अतिक्रमणांवर प्रशासनाने काढलेला केडीएमटीचा हा ‘उतारा’ फारसा परिणामकारक झाल्याचे दिसून येत नाही. दुसरीकडे केडीएमसीच्या बहुतांश भाजी मंडया वापराविना ओस पडल्या आहेत. यात नेहरू रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज मंडईचा आवर्जून उल्लेख करावा लागेल.
शहर वसवताना, लोकसंख्येच्या गरजेनुसार तशा सुविधा निर्माण करणे आवश्यक असते. परंतु, केडीएमसी प्रशासन या सेवा पुरवण्यात सपशेल अपयशी ठरले आहे. येथील फेरीवाला आणि रिक्षा संघटना या राजकीय पाठबळावरच विशेष बाब म्हणजे सत्ताधाºयांचे अभय त्यांना लाभत असल्याने त्यांची मुजोरी दिवसागणिक वाढत आहे.
ठाकुर्लीची वेगळी परिस्थिती नाही. कल्याण-डोंबिवलीतील समांतर रस्त्यामुळे येथील रेल्वे फाटक आणि चोळेगावचा रस्ता पश्चिमेत जाण्यासाठी वाहनचालक सर्रास वापरतात. सकाळी १० ते दुपारी १ आणि सायंकाळी ६ ते ९ या काळात हनुमान मंदिर परिसरातील चौकात वाहतूककोंडी होते. मध्यंतरी, या कोंडीवर उपाय म्हणून म्हसोबा चौक, चोळेगाव-ठाकुर्ली भागांतून जाणाºया अवजड वाहनांना प्रायोगिक तत्त्वावर बंदी घातली होती. लवकरच अधिसूचनाही काढली जाणार होती.
पदे मिळाली, विकास शून्य
कल्याणच्या पाठोपाठ केडीएमसीतील महत्त्वाची पदे डोंबिवलीला मिळाली. मात्र, त्या तुलनेत डोंबिवलीचा विकास झाला नाही, हे सत्य नाकारता येत नाही. आजघडीला राज्यमंत्रीपद रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने शहराला व्यापक नेतृत्त्व लाभले. परंतु, शहराच्या विकासाच्या दृष्टीने कोणत्याही हालचाली होताना दिसत नाहीत.
विरोधी पक्षनेत्याच्या पत्राकडे दुर्लक्ष
डोंबिवली स्थानक परिसरातील एकंदरीतच उडालेल्या बोजवाºयाबाबत विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी पुढाकार घेत सर्वपक्षीय स्थानिक पदाधिकारी, आमदार, खासदार, मंत्री यांना पत्र पाठवून विशेष बैठक लावण्याची विनंती केली होती. परंतु, हळबे यांनी पाठवलेल्या पत्राला साधे उत्तरही दिले नाही. यावरून, राजकीय मानसिकता कशी आहे, याची प्रचीती यानिमित्ताने येते.
अहवालावर कार्यवाहीच नाही-
कल्याण-डोंबिवलीतील वाहतूक सुरळीत व्हावी, तसेच कोंडीवर उपाय सुचवण्यासाठी नेमलेल्या कोअर कमिटीने याबाबतचा अहवाल वरिष्ठांकडे पाठवला आहे. परंतु, आजवर यावर ठोस कार्यवाही न झाल्याने या ठिकाणची वाहतूककोंडीची समस्या कायम आहे.
प्रायोगिक तत्त्वावर अवजड वाहनांना बंदी केल्याचा प्रयोगही यशस्वी होऊ शकलेला नाही. ठिकठिकाणी झालेले अतिक्रमण आणि बेकायदा रिक्षातळाचा पडलेला विळखाही कारणीभूत ठरत असून एकंदरीतच दोन्ही शहरांचा आढावा घेता शहर, वाहतूक आणि आरटीओ पोलिसांचा नाकर्तेपणा, त्यातच प्रशासन, सत्ताधाºयांचे अभय देण्याची प्रवृत्ती बकालपणाला कारणीभूत आहे.

Web Title: Dombivlikar sittila due to lack of policy! The cultural dilemma of 'Kandi'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.