शिंदे यांच्या विजयात डोंबिवलीचे अमूल्य योगदान '
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 12:04 AM2019-05-25T00:04:13+5:302019-05-25T00:04:17+5:30
संघ परिवाराची मिळाली भक्कम साथ : विधानसभा मतदारसंघातून मिळाली एक लाख १२ हजार मते
कल्याण लोकसभेंतर्गत येणारा डोंबिवली विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपचा बालेकिल्ला. शहरातील सुशिक्षित मतदारांनी पुन्हा मोदींना दिल्लीच्या तक्तावर बसवण्याच्या उद्देशाने महायुतीच्या पदरात भरभरून दान टाकले. महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे हे तीन लाख ४४ हजार ३४३ मताधिक्याने निवडून आले. डोंबिवलीतून एकूण एक लाख ४३ हजार ९३८ मतदान झाले. त्यापैकी शिंदेंना एक लाख १२ हजार ५३७ मते, तर राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांना केवळ १९ हजार ५४७ मते पडली. त्यामुळे शिंदे यांच्या विजयात डोंबिवलीचा मोठा वाटा आहे.
२०१४ च्या निवडणुकीत शिवसेनेला ९० हजार ३५९, राष्ट्रवादीला १८ हजार १७४ आणि मनसेला २६ हजार ५३९ मते पडली होती. यंदा शिंदे यांना डोंबिवलीतून मिळालेली एक लाख १२ हजार ५३७ मते पाहता यंदा २२ हजार १७८ वाढीव मते मिळाली आहेत. डोंबिवलीत ब्राह्मण, आगरी, कोकणी, दाक्षिणात्य, गुजराती, जैन असे सर्वधर्मीय मतदार आहेत. त्यातील पारंपरिक मतदार, नव्याने नोंदणी झालेले युवा मतदार यांनीही महायुतीला साथ दिली. विविध सामाजिक संघटना अगोदरपासूनच शिंदे यांच्या पाठीशी होत्या.
केडीएमसीत शिवसेनेचे ५६, तर भाजपचे ४२ नगरसेवक आहेत. त्यापैकी डोंबिवली शिवसेनेचे ११, तर भाजपचे १९ नगरसेवक आहेत. लोकसभेसाठी महायुती होण्यापूर्वी दीड महिना आधीपर्यंत शिवसेना-भाजप वेगळे लढतील, असे चित्र होते. त्यामुळे शिवसेनेसोबत नाही, हे गृहीत धरून भाजपने आधीपासूनच बुथरचनेवर पकड जमवली. आॅक्टोबर २०१५ मध्ये झालेल्या केडीएमसीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीतील नगरसेवकांना राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपमध्ये घेतले होते. त्यामुळे डोंबिवलीत राष्ट्रवादीचा एकही नगरसेवक नाही. तर, पश्चिमेला काँग्रेसचे दोन नगरसेवक असले, तरीही त्यांना त्यांच्या प्रभागांपुरतेच मर्यादित ठेवण्यात महायुतीला यश आले आहे.
भाजपबरोबर सुरुवातीला शिवसेनेने स्वतंत्र लढण्याची तयारी केली. त्यांनीही बुथरचनेवर भर दिला. तसेच श्रीकांत शिंदे यांनीच विजय मिळवण्यासाठी स्वत: मास्टर प्लॅन आखला होता. मात्र, पालकमंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी परिवहन समितीच्या निवडणुकीत एकमेकाला टाळी दिल्याने जवळपास युती होईल, असे संकेत मिळाले होते आणि झालेही तसेच. त्यामुळे या मतदारसंघात महायुतीने गुलाल आम्हीच उधळणार, असा चंग बांधला होता.
दुसरीकडे मनसे निवडणुकीच्या रिंगणात नव्हतीच. त्यामुळे या मतदारसंघात जरी त्यांचे तीन नगरसेवक असले, तरी पारंपरिक मतदारांसमोर कोणाला मतदान करण्याचे आवाहन करायचे, हा मोठा पेच त्यांच्या नगरसेवकांपुढे शेवटपर्यंत होता.
राष्ट्रवादी उमेदवार बाबाजी पाटील यांनी आगरी समाजाची मते, पक्षातील कुरबुरी, गटातटांच्या राजकारणातून कशीबशी वाट काढत कार्यकर्त्यांची जमवाजमव करण्याचा प्रयत्न केला. माजी मंत्री गणेश नाईक यांनी डोंबिवलीत येऊन विविध पक्षांच्या नगरसेवकांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. मात्र, त्याचा काहीच फायदा झाला नाही. डोंबिवलीतून पाटील यांना १९ हजार ५४७ मते मिळाली. लोकसभेच्या निवडणुकीत यंदा प्रथमच उतरलेल्या वंचित बहुजन आघाडीलाही येथून साथ मिळाली नाही. त्यांचे उमेदवार संजय हेडावू यांना केवळ चार हजार ७४९ मते मिळाली.
दरम्यान, डोंबिवलीतून ‘नोटा’ची संख्या दोन हजार ५२८ इतकी आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन सर्वच पक्षांना ही मते कोणती होती, याचा गांभीर्याने अभ्यास करावा लागणार आहे. शहरातील वाहतूककोंडी, रेल्वेस्थानक परिसराचा विकास, फेरीवाले, मुबलक पाणी, सक्षम दळणवळण, पूलकोंडी फोडणे, चांगली आरोग्यसेवा आदी समस्या सोडवण्यावर राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांना भर द्यावा लागणार आहे.