डोंबिवलीत उलगडले कवितांचे भावविश्व

By admin | Published: July 26, 2016 04:33 AM2016-07-26T04:33:51+5:302016-07-26T04:33:51+5:30

इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांना मराठी कवितेचे भावविश्व उलगडून दाखवण्यासाठी जुन्या, नव्या कविता ‘स्पेशल इफेक्ट’च्या माध्यमातून सादर करण्यात आल्या.

Dombivliyat Unleaved poems | डोंबिवलीत उलगडले कवितांचे भावविश्व

डोंबिवलीत उलगडले कवितांचे भावविश्व

Next

डोंबिवली : इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या मुलांना मराठी कवितेचे भावविश्व उलगडून दाखवण्यासाठी जुन्या, नव्या कविता ‘स्पेशल इफेक्ट’च्या माध्यमातून सादर करण्यात आल्या. या कवितांना वन्समोअरची दाद मिळाली. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच्या कवितांचा यात समावेश होता.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या डोंबिवली शाखेच्या युवा विभागातर्फे सुरू झालेल्या अभिव्यक्ती उपक्रमांतर्गत ‘सृष्टीगान’ हा कार्यक्रम झाला. हा कार्यक्रम आनंद बालभवन येथे झाला. या कार्यक्रमाची संकल्पना वैशाली वैशंपायन यांची, तर मकरंद वैशंपायन यांनी संगीत संयोजन केले होते. आनंद हरिदास आणि पल्लवी आनंद यांनी नृत्य दिग्दर्शन केले. सौरभ सोहोनी यांनी कार्यक्रमाचे दिग्दर्शन व निवेदन केले. बच्चेकंपनीसोबत त्यांचे आजीआजोबा उपस्थित होते. त्यामुळे त्यांनाही त्यांच्या नातवंडांसोबत बालपण पुन्हा एकदा अनुभवता आले.
आनंद हरिदास यांच्या वर्गातील २५ बालकलाकार सहभागी झाले होते. कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी गायन, वाचन आणि नृत्य सादर केले. या वेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे डोंबिवली शाखेचे अध्यक्ष दिलीप गुजर, कल्याण-डोंबिवली महापालिकेचे सभागृहनेते राजेश मोरे, वेध अकादमीचे संकेत ओक, मधुरा ओक, भारती ताम्हणकर, दीपाली काळे उपस्थित होते. तसेच ती फुलराणी या नाटकातील कलाकार हेमांगी कवी, डॉ. गिरीश ओक, मीनाक्षी जोशी, नितीन नारकर, प्रांजल दामले, अंजली मायदेव, रसिका धामणकर, विजय पटवर्धन, सुनील जाधव, हरीश तांदळे, दिशा दानडे, शिवाजी शिंदे, निर्माता धनंजय चाळके, लीना जुवेकर यांची विशेष उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात कवी गोविंद यांच्या ‘नमने वाहुनि स्तवने उधळा’ या भूपाळीने झाली. बालकवी यांची ‘ऊठ मुला बघ अरुणोदय झाला’ ही कविता सादर करण्यात आली. कुसुमाग्रजांची ‘गोड सकाळी ऊन पडे, दवबिंदूचे पडती सडे, शांता शेळके यांच्या वेश रेशमी लेवू, या गरगर गिरकी घेऊ या, गदिमांच्या ‘इवल्या इवल्याशा टिकल्या टिकल्यांचे देवाचे घर बाई उंचावर’ या कवितेला चांगलीच दाद मिळाली. सुमनबाई कासार यांची ‘हसत जाऊ फुले सुगंधी घेऊ’ ही कविताही चांगली रंगली.
बालकवींच्या ‘तारकांचे गाणे’मधील ‘कुणी नाही गं कुणी नाही, आम्हाला पाहत बाई’ या गीतावर नृत्य करताना मुलांनी चांदण्या परिधान केल्या होत्या. सभागृहात अंधार केल्यावर तारांगण अवतरल्याचा जणू भास झाला. या नृत्याला प्रेक्षकांनी उत्स्फूर्त दाद दिली. कार्यक्रमाचा शेवट ढेरे यांच्याच ‘सुंदर जग सुंंदर सृष्टी’ या कवितेच्या सादरीकरणाने झाला.
हेमांगी कवी म्हणाल्या, ‘ती फुलराणी’ नाटकाचा पहिला प्रयोग डोंबिवलीत झाला. पहिल्या प्रयोगाच्या वेळी खूप दडपण होते. कारण, पु.लं.नी या नाटकाला एका उंचीवर नेऊन ठेवले आहे. यातील संवादाला तर तोड नाही, असे त्यांनी सांगितले. ५० व्या प्रयोगानंतर थोडे दडपण कमी झाले आहे. पण, जबाबदारी वाढली आहे. रसिकांना नाटक आवडत आहे. प्रेक्षकांच्या अपेक्षेपर्यंत पोहोचता आले पाहिजे.
डॉ. गिरीश ओक म्हणाले, ज्या दिवशी दडपण जाईल, त्या दिवशी नाटकात काम करणे सोडून देईन. दडपणाशिवाय काहीही होत नाही, असे त्यांनी सांगितले. या नाटकातील सर्व कलाकार आणि निर्मात्यांनी प्रेक्षकांशी संवाद साधला. (प्रतिनिधी)

कवितेला शॅडो इफेक्ट
- अ.ज्ञा. पुराणिक यांच्या ‘फुलपाखरे’ नावाच्या कवितेतील ओळी, धरू नका ही बरे, फुलांवर उडती फुलपाखरे, याचे प्रत्यक्ष चित्रच डोळ्यांसमोर उभे राहिले.
- अरुणा ढेरे यांच्या ‘सरीवर सरी’ या गाण्यावर मुलांनी नृत्य सादर क रताना प्रत्यक्ष छत्र्यांचा वापर रंगमंचावर केल्याने सगळ्यांनी टाळ्या वाजवून मनमुराद दाद दिली. शांता शेळके यांच्या ‘पक्ष्यांच्या दुनियेत’ या कवितेला शॅडो इफेक्ट देण्यात आला होता.
- या कवितेच्या सादरीकरणास वन्समोअर मिळाला. कार्यक्रमाचा शेवट ढेरे यांच्याच ‘सुंदर जग सुंंदर सृष्टी’ या कवितेच्या सादरीकरणाने झाला.

Web Title: Dombivliyat Unleaved poems

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.