डॉन बाॅस्को शाळेच्या मनमानी फीवाढीविरोधात ‘ठिय्या’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:49 AM2021-07-07T04:49:41+5:302021-07-07T04:49:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील डॉन बॉस्को शाळेने यंदाच्या वर्षी शैक्षणिक फीमध्ये अडीच हजार रुपयांची वाढ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : पूर्वेतील मानपाडा रस्त्यावरील डॉन बॉस्को शाळेने यंदाच्या वर्षी शैक्षणिक फीमध्ये अडीच हजार रुपयांची वाढ केल्याच्या विरोधात शाळेसमोर पालकांनी सोमवारी ठिय्या आंदोलन केले. तसेच पूर्ण फी न भरल्याने अनेक विद्यार्थ्यांची ऑनलाइन शाळा बंद करण्याचा निर्णय शाळेने घेतल्याने या वेळी पालकांनी संताप व्यक्त केला. दरम्यान, भाजपने पालकांच्या या आंदोलनाला पाठिंबा दिला. पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर मंगळवारी शाळेच्या संचालक बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात आले.
या आंदोलनात भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली ग्रामीण मंडल अध्यक्ष नंदू परब, माजी सरपंच कर्ण जाधव, सुहासिनी राणे, रसिका पाटील, राजू शेख आदींसह अनेक कार्यकर्ते आणि पालक सहभागी झाले होते.
या वेळी परब म्हणाले की, ‘कोरोनामुळे अनेक पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, तर हातावर पोट असणारेही काही पालक आहेत. या सगळ्याचा विचार करून शाळेने निर्णय घ्यावा. फी भरण्यासाठी पालक तयार आहेत, परंतु त्यासाठी पुरेसा वेळ आम्हाला द्यावा. फी न भरल्याने ऑनलाइन शाळेत प्रवेश नाकारल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या सगळ्या गोष्टींचा फीवाढ करताना शाळेने बारकाईने विचार करावा. शाळा मनमानी पद्धतीने शैक्षणिक फी वाढवत आहे.’
शाळा संचालकांशी बोलून काढणार तोडगा
- फीवाढीचे कारण विचारण्यासाठी गेलेल्या पालकांना शाळेने अरेरावी केली. त्यामुळे संतप्त पालकांनी शाळेसमोर गर्दी केली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाची फी अडीच हजारांनी वाढवली आहे.
- अर्धी फी भरलेल्या विद्यार्थ्यांची ऑनलाइन शाळा सुरू असून, या महिनाअखेरपर्यंत पूर्ण फी न भरल्यास पाल्याला ऑनलाइन शाळेत बसता येणार नसल्याचे शाळेकडून सांगण्यात आले.
- मागील वर्षीचे प्रगती पुस्तकही या वर्षीची पूर्ण फी भरल्याशिवाय मिळणार नसल्याची भूमिका शाळेची असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात शाळेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शाळा संचालकांशी बोलून, यावर तोडगा काढण्यात येईल, असे सांगितले.
---------------