‘डॉन बोस्को’च्या विद्यार्थ्यांचे अखेर ऑनलाईन शिक्षण सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:50 AM2021-07-07T04:50:38+5:302021-07-07T04:50:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : फीवाढ आणि वसुलीविरोधात डॉन बोस्को शाळेच्या समोर पालक, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी पुन्हा ...

Don Bosco students finally start learning online | ‘डॉन बोस्को’च्या विद्यार्थ्यांचे अखेर ऑनलाईन शिक्षण सुरू

‘डॉन बोस्को’च्या विद्यार्थ्यांचे अखेर ऑनलाईन शिक्षण सुरू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : फीवाढ आणि वसुलीविरोधात डॉन बोस्को शाळेच्या समोर पालक, भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मंगळवारी पुन्हा ठिय्या आंदोलन केले. शाळा व्यवस्थापनाने पालकांच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्याने पालकांनी आंदोलन मागे न घेण्याचा पवित्रा घेतला. त्यामुळे वातावरण चिघळणार असल्याची शक्यता गृहीत धरून पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन मानपाडा पोलीस ठाण्यात नेले. तेथे काही वेळ शाळा व्यवस्थापन आणि भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाल्यावर शाळा व्यवस्थापनाने संध्याकाळी उशिराने पालकांच्या मागण्या मान्य केल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू झाले आहे.

भाजपचे डोंबिवली ग्रामीण मंडल अध्यक्ष नंदू परब, उपाध्यक्ष कर्ण जाधव, मंडल अध्यक्षा सुहासिनी राणे, रसिका पाटील, माजी नगरसेविका डॉ. सुनीता पाटील, माजी नगरसेवक नीलेश म्हात्रे, राजन आभाळे, मिहीर देसाई हे या आंदोलनात सहभागी झाले होते. शाळेच्या व्यवस्थापनाने पालकांशी काही अटींवर फीबाबत निर्णय घेऊ, असे सांगितले. मात्र, आंदोलनकर्त्यांनी ते मान्य केले नाही. दुपारपर्यंत आंदोलन सुरूच राहिल्याने पोलिसांनी पालकांना आंदोलन मागे घेण्यास सांगितले. मात्र, आंदोलनकर्ते मागण्यांवर ठाम होते.

फीमध्ये दिली सवलत

- भाजप पदाधिकारी आणि शाळा संचालक जॉन लोबो यांच्यात काही वेळाने मानपाडा पोलिसांनी पोलीस ठाण्यात चर्चा घडवून आणली. चर्चा संपल्यावर लोबो यांनी पालकांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.

- सप्टेंबरपर्यंत जे पालक संपूर्ण फी भरतील, त्यांना फीमध्ये २० टक्के सवलत आणि सप्टेंबरनंतर जे पालक फी भरतील त्यांना फीमध्ये १४ टक्के सवलत दिली जाईल. तसेच ज्या पालकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत किंवा अन्य कारणांनी ते उशिरा फी भरू शकतील, अशा पालकांनी शाळेशी संपर्क साधून तसे लेखी लिहून दिल्यास, यावर विचार करून निर्णय घेऊ.

- ज्या विद्यार्थ्यांचे पालक कोरोनामध्ये मृत्यू पावले आहेत, त्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण दिले जाईल, असे लोबो म्हणाले.

---------

Web Title: Don Bosco students finally start learning online

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.