दहा वर्षांमध्ये ३० लाखांची पुस्तके केली दान
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 12:56 AM2019-11-28T00:56:20+5:302019-11-28T00:56:36+5:30
वाचनसंस्कृती जपण्यासाठी कल्याण येथील अक्षरमंच सामाजिक प्रतिष्ठान आणि डोंबिवलीतील आनंद कल्याणकारी संस्था अविरत झटत आहे.
- जान्हवी मोर्ये
डोंबिवली : वाचनसंस्कृती जपण्यासाठी कल्याण येथील अक्षरमंच सामाजिक प्रतिष्ठान आणि डोंबिवलीतील आनंद कल्याणकारी संस्था अविरत झटत आहे. या संस्थांच्या माध्यमातून दहा वर्षांत तब्बल ३० लाखांची पुस्तके विविध संस्थांना भेट देण्यात आली आहेत. वाचनाचे प्रमाण कमी झाल्याने ग्रंथालयांचा आर्थिक डोलारा डगमगू लागला आहे. महापुराचा फटका बसलेल्या सांगली जिल्हा नगर वाचनालयाला १२५ पुस्तके भेट देत मदतीचा हात पुढे केला आहे.
सांगली जिल्हा नगर वाचनालयाचे यंदा शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्ष आहे. यावर्षी आलेल्या महापुरामध्ये या वाचनालयाचे अतोनात नुकसान झाले. अनेक पुस्तके महापुरात वाहून गेली. त्यात दुर्मीळ ग्रंथांचे मोठे नुकसान झाले. या वाचनालयाला मदतीचा हात पुढे करून अक्षरमंच आणि आनंद कल्याणकारी संस्थेने खारीचा वाटा उचलला आहे. कथासंग्रह, कादंबरी, कवितासंग्रह आणि इतर विविध विषयांवरील १२५ पुस्तके या ग्रंथालयाला भेट देण्यात आली.
सांगली नगर वाचनालय व्याख्यानमाला कार्यक्रमाच्या निमित्ताने अक्षरमंच प्रतिष्ठान अध्यक्ष डॉ. योगेश जोशी, उपाध्यक्ष जयंत भावे, आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था अध्यक्ष हेमंत नेहेते, पदाधिकारी बाळासाहेब तोरसकर वाचनालयात गेले होते. यावेळी कार्यवाह अतुल गिजरे, सहकार्यवाह सुहास करंदीकर यांच्याकडे पुस्तके प्रदान केली. संस्थेच्या या उपक्रमाचे समन्वयक जयंत भावे यांनी वाचनालयास आणखी पुस्तके व विश्वकोश खंड लवकरच भेट देणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
दोन्ही संस्थांनी दहा वर्षांत ४०० हून अधिक शाळा, ग्रंथालये, आश्रमशाळा, अनाथालयांमध्ये ३० लाखांची ५० हजारांहून अधिक पुस्तके भेट दिली आहेत. तसेच सांगली नगर वाचनालयाला दिलेल्या पुस्तकांमध्ये ऐतिहासिक आणि भौगोलिक पुस्तकांचा समावेश आहे. संस्थांतर्फे अनेक कार्यक्रम घेतले जातात, त्यातही पुष्पगुच्छ न देता पुस्तके भेट दिली जातात. गेल्या वर्षी संस्थांतर्फे कल्याण-डोंबिवली परिसरात ११ हजार १११ पुस्तकांचे वाटप करण्यात आले. त्यात १७५ शाळांचा समावेश होता. दिवाळीमध्ये वृद्धाश्रमांना पुस्तके आणि काही ठिकाणी दिवाळी अंक देण्यात आले. भुसावळ येथे पाच हजार पुस्तके भेट देण्यात आली.
पुस्तके दान केल्यास ग्रंथालये जगतील!
संस्थेतर्फे पुस्तकांचे प्रकाशन केले जाते. त्यावेळी कधी काही लेखक संस्थेला पुस्तके देतात, काही नागरिक ती आणतात. कोणी पैसेही देते. त्याची संस्थेकडून पावती दिली जाते, असे हेमंत नेहते यांनी सांगितले. मंदिरात अनेक जण पैसे दान करतात. पण या पैशांचा उपयोग पुस्तके भेट देण्यासाठी झाला तर ग्रंथालये जगतील आणि वाचनसंस्कृती वृद्धिंगत होण्यास मदत होईल, असे नेहते म्हणाले.