दबावापुढे झुकू नका; आमदार गायकवाड यांच्या पाठीशी भाजपचे पदाधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 11:06 AM2024-02-07T11:06:41+5:302024-02-07T11:18:06+5:30

शिंदे गटाच्या दबावापुढे झुकू नका, कारवाई करू नका : पक्षातून मागणी

Don't bow to pressure; BJP officials with the support of MLA Gaikwad | दबावापुढे झुकू नका; आमदार गायकवाड यांच्या पाठीशी भाजपचे पदाधिकारी

दबावापुढे झुकू नका; आमदार गायकवाड यांच्या पाठीशी भाजपचे पदाधिकारी

कल्याण : शिवसेनेच्या शिंदे गटाच्या दबावाला बळी पडून भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्यावर विनाकारण कारवाई करू नका. शिवसेनेच्या दबावतंत्राला बळी पडलो तर राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांत भाजपच्या लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांचे खच्चीकरण शिवसेनेकडून सुरू होईल, अशा भावना भाजपचे काही आमदार, पदाधिकारी व कल्याणमधील गायकवाड यांचे कार्यकर्ते यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त केल्या. यामुळे शिवसेनेकडे मुख्यमंत्रिपद असले तरी त्या पक्षाच्या दबावतंत्राला भाजप बळी पडणार नसल्याचे संकेत प्राप्त झाले.

शिवसेनेच्या शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या समर्थनार्थ कल्याण पूर्वेत बॅनर लावण्यात आलेत. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक पार पडली. बैठकीत कल्याण पूर्वेतील भाजप पदाधिकारी आ. गायकवाड यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेण्यात आला. कल्याणमधील पदाधिकाऱ्यांनी राज्यातील काही भाजप आमदारांशी संपर्क साधून शिवसेनेच्या मंत्र्यांच्या दबावतंत्राला बळी पडू नका, अशी विनंती उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केल्याचे एका पदाधिकाऱ्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

आ. गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आपले शेकडो कोटी रुपये पडून असल्याचा आरोप केल्याने शिंदे व त्यांचे समर्थक मंत्री व आमदार कमालीचे बिथरले आहेत. त्यांनी फडणवीस यांची भेट घेऊन आ. गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी केली. त्यानंतर लागलीच आ. गायकवाड यांच्या समर्थनार्थ भाजपा पदाधिकारी, कार्यकत्र्यांची बैठक पार पडली. तीत सगळ्यांनी आ. गायकवाड यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला. या घटनेने कल्याण पूर्वेत भाजप कमकुवत होईल, अशी कुणाची भावना असेल तर तो गैरसमज आहे, असे स्पष्ट करण्यात आले. 

कडेलोट झाल्याने गायकवाड यांनी उचलले पाऊल

■ भाजपचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी यांच्यात शिवसेनेच्या गेल्या काही महिन्यांतील आक्रमकतेविरुद्ध खदखद आहे. त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांच्या दबावाला न जुमानता आ. गायकवाड यांच्या पाठीशी उभे राहण्याची भावना भाजपमध्ये जोर धरत आहे.
• आ. गायकवाड यांचा मार्ग चुकीचा असेल, पण शिवसेनेचे नेते ज्या पद्धतीने सतत त्यांचा अपमान करत होते, त्यांच्या कामाचे श्रेय लाटत होते ते पाहता त्यांच्या संयमाचा कडेलोट झाला व त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले.
• आ. गायकवाड यांच्या गोळीबारानंतरही जनमानसात त्यांची लोकप्रियता कायम असल्याकडे भाजपचे नेते लक्ष वेधत आहेत. ठाणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या शहरांत शिदे गटाची झुंडशाही भाजपच्या कार्यकर्त्यांनी गेल्या दोन वर्षात सहन केली असल्याचे सांगत भाजप गायकवाड प्रकरणानंतर एकवटली असल्याचे कार्यकर्त्याचे म्हणणे आहे.

Web Title: Don't bow to pressure; BJP officials with the support of MLA Gaikwad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.