गुन्हा दाखल करण्याची वेळ पोलिसांवर आणू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 05:16 AM2021-02-21T05:16:11+5:302021-02-21T05:16:11+5:30
कल्याण : गुन्हा दाखल करणे हा पोलिसांचा हेतू नाही. नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन कल्याणचे पोलीस ...
कल्याण : गुन्हा दाखल करणे हा पोलिसांचा हेतू नाही. नागरिकांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन कल्याणचे पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी केले.
कल्याण डोंबिवली महापालिका ही जून महिन्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरली होती. कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेने अथक प्रयत्न केले. लॉकडाऊनचे कडक पालन करण्याचा प्रयत्न केला गेला. नागरिकांनीही त्याला चांगली साथ दिली. कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांत महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे तसेच गर्दी जमा न करता कार्यक्रम पार पाडणे याचे पालन केले पाहिजे. सध्या कोरोना नियमांचे पालन करताना नागरिक दिसून येत नाहीत. ज्यांच्यावर सामाजिक भान जपण्याची जबाबदारी आहे त्यांच्याकडूनही कोरोना नियम पाळले जात नाहीत. डोंबिवलीतील भाजप पदाधिकाऱ्याने त्यांच्या वाढदिवसाला गर्दी गोळा केली होती. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर कल्याण पश्चिमेतील भाजपच्या माजी नगरसेवकाने शुक्रवारी सायंकाळी हळदी-कुंकू समारंभ आयोजित केला होता. त्या ठिकाणीही गर्दी जमली होती. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर कल्याण पश्चिमेतील डी-मार्टमध्ये ग्राहकांनी खरेदीसाठी गर्दी केली होती. त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नसल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आल्याने डी मार्टच्या विरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कोरोना नियमांचे पालन करा. अन्यथा गुन्हा दाखल होऊ शकतो. गुन्हा दाखल करण्याची वेळ पोलिसांवर आणू नका, असे आवाहन उपायुक्त पानसरे यांनी केले.
-----------------
वाचली