कब्रस्तानमध्ये राजकारण नकाे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:40 AM2021-09-19T04:40:46+5:302021-09-19T04:40:46+5:30
मुंब्राः येथील कौसा भागातील एम. एम. व्हॅली परिसरातील कब्रस्तानमध्ये मृतदेह दफन करण्यासाठी खड्डा खोदताना जमिनीमधून पाणी निघत असल्याचा ...
मुंब्राः येथील कौसा भागातील एम. एम. व्हॅली परिसरातील कब्रस्तानमध्ये मृतदेह दफन करण्यासाठी खड्डा खोदताना जमिनीमधून पाणी निघत असल्याचा व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या पार्श्वभूमीवर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, ठामपाचे विरोधी पक्षनेते अशरफ ऊर्फ शानू पठाण, परिवहन समितीचे सदस्य शमिम खान, कार्यकारी अभियंता धनजंय गोसावी यांनी शुक्रवारी तातडीने कब्रस्तानची पाहणी केली. यावेळी कब्रस्तानमधील कामात कुठलीही त्रुटी नसून मागील काही दिवसांमध्ये पडलेल्या मुसळधार पावसाचे मुरलेले पाणी जमिनीमधून नाही तर कोठून बाहेर पडणार, असा प्रतिप्रश्न आव्हाड यांनी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांना केला.
किमान कब्रस्तानमध्ये तरी राजकारण करू नका, असे आवाहन केले. पाच एकर भूखंडांवरील या कब्रस्तानसाठी १७ करोड रुपये खर्च केले असून, सद्य:स्थितीत या कब्रस्तानमध्ये तीन हजार २०० मृतदेह दफन करण्यात आले आहेत. हे कब्रस्तान नसते तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह दफन करण्यामध्ये मोठ्या अडचणी निर्माण झाल्या असत्या. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या भिंवडी, घाटकोपर, विक्रोळी आदी ठिकाणचे मृतदेह येथे दफन केले असल्याची माहिती आव्हाड यांनी यावेळी दिली.