कोणत्याही आमिषाला बळी पडू नका- विवेक फणसळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:43 AM2021-05-06T04:43:02+5:302021-05-06T04:43:02+5:30
ठाणे: चांगल्या कार्याची दखल निश्चितच घेतली जाते. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. कोरोनाची दुसरी लाट सहज घेऊ नका. आपल्या ...
ठाणे: चांगल्या कार्याची दखल निश्चितच घेतली जाते. कोणत्याही आमिषाला बळी पडू नका. कोरोनाची दुसरी लाट सहज घेऊ नका. आपल्या कुटुंबीयांसह नागरिकांची आणि स्वत:चीही काळजी घ्या, असा सल्ला ठाण्याचे मावळते पोलीस आयुक्त तथा राज्याच्या पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक फणसळकर यांनी आपल्या पोलिसांना बुधवारी दिला. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील ३१ पोलिसांना त्यांच्या हस्ते पोलीस महासंचालक सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील १४ अधिकाऱ्यांसह ३३ पोलिसांना सलग १५ वर्षे उत्कृष्ट सेवा बजावल्याबद्दल महाराष्ट्रदिनी पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह जाहीर झाले. हे सन्मानचिन्ह (३३ पैकी ३१) या कर्तबगार अधिकारी, कर्मचाऱ्यांना बहाल केल्यानंतर त्यांच्याशी हितगुज साधताना फणसळकर पुढे म्हणाले, तुम्ही केलेल्या चांगल्या कामाची ही पोचपावती आहे. चांगल्या कामाची दखल निश्चितच घेतली जाते. शासनाने ज्यांच्या संरक्षणाची, तसेच कायदा सुव्यवस्थेची धुरा तुमच्यावर सोपविली आहे, ती व्यवस्थित पार पाडा. कोरोनाची दुसरी लाट सहज घेऊ नका. स्वत:बरोबरच आपल्या कुटुंबाचीही काळजी घ्या. योग्य आणि अयोग्य हे ठरविता आले पाहिजे. कोरोना काळात ठाणे पोलिसांनी खूप धैर्याने काम केले. यापुढेही अशाच प्रकारचे काम करावे लागेल. महासंचालक पदक मिळाले तसेच आणखी उत्कृष्ट काम करून राष्ट्रपती पदकालाही गवसणी घाला. उत्तम आरोग्य ठेवा, कोरोनाचा हा वाईट काळ जाईल. त्यामुळे सकारात्मक दृष्टिकोन ठेवा, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
* पोलीस सेवेत गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल सहायक पोलीस आयुक्त किसन गवळी, निरीक्षक संजू जॉन, दिलीप रासम, उपनिरीक्षक विजय उपाळे, संजय गळवे, रमेश जाधव, जमादार रामसिंग चव्हाण, स्रेहा करनाळे, विजयकुमार राठोड, अशोक राणे, सुरेंद्र पवार, संजय सातुर्डेेकर, विजय उगले तसेच हवालदार मोहन चौधरी, रवींद्र पाटील, मच्छिंद्र पगारे आणि सुभाष मोरे आदी ३१ जणांना हे पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह फणसळकर यांनी प्रदान केले.
* हे सन्मानचिन्ह योगायोगाने मंगळवारी महासंचालकपदी बढती मिळालेल्या फणसळकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आल्यामुळे सन्मानचिन्ह प्राप्त पोलिसांनीही समाधान व्यक्त केले.
* यावेळी सहपोलीस आयुक्त सुरेश मेकला, अतिरिक्त आयुक्त प्रवीण पवार, संजय येनपुरे, पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील आणि श्रीकृष्ण कोकाटे यांच्यासह अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.