ओटीपी, पासवर्ड शेअर करुन भक्ष्यकाचे शिकार होऊ नका; सहपोलीस आयुक्तांनी विद्यार्थ्यांना केले सतर्क
By प्रज्ञा म्हात्रे | Published: July 26, 2023 04:56 PM2023-07-26T16:56:00+5:302023-07-26T17:00:51+5:30
ठाणे शहर आयुक्तालय आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल यांच्यावतीने बुधवारी ज्ञानसाधना महाविद्यालयात सायबर गुन्हे आणि वाहतूक सुरक्षा या विषयावर परिसंवादाचा आयोजन केले होते.
ठाणे : सायबर गुन्हे हे कुणासोबतही घडू शकतात. यात फेसलेस आणि बॉर्डरलेस क्राईम देखील आहेत. सायबर गुन्हे घडू नये यासाठी सावधगिरीचा उपाय म्हणजे नागरिकांनी स्वत: सतर्क राहणे आणि सावधानता बाळगणे. आपण कळत न कळत ओटीपी, पासवर्ड शेअर करतो आणि भक्ष्यकाचे शिकार ठरतो. त्यामुळे कोणतीही माहिती शेअर करताना सावध राहणे अत्यंत आवश्यक असते, अशा शब्दांत सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी मार्गदर्शन केले.
ठाणे शहर आयुक्तालय आणि रोटरी क्लब ऑफ ठाणे सेंट्रल यांच्यावतीने बुधवारी ज्ञानसाधना महाविद्यालयात सायबर गुन्हे आणि वाहतूक सुरक्षा या विषयावर आयोजित परिसंवादात विद्यार्थ्यांनी सावध आणि सतर्क कसे राहिले पाहिजे, कोणत्या चुका त्यांच्याकडून होऊ शकतात, कोणत्या टाळल्या पाहिजेत याबाबत प्रेेझेंटेशनद्वारे समजावून सांगण्यात आले. कराळे म्हणाले की, आपला मोबाईल चोरीला गेला तर तो आसपासच्या भागात चोरीला गेला असेल असा अंदाज लावू शकतो, पण मोबाईलमधला डेटा तो आपल्या आसपास चोरीला गेला, देशाबाहेर गेला की अन्यत्र हे सांगू शकत नाही आणि त्यालाच फेसलेस क्राईम म्हणतात. या गुन्हयाला डिटेक्ट करता आले तरी त्यातील गुन्हेगाराला पकडणे अवघड असते. एक तर कायदयाची अडचण येते, तसेच, परदेशातील एखाद्या गुन्हेगाराला आणणे अवघड होते. वाहतूकीबाबतही तेवढी काळजी घेतली पाहिजे.
भारताला दरवर्षी साडेचार ते पाच लाख अपघात होतात. त्यापैकी दीड लाख लोक अपघाताने मृत्यू पडतात. कोणत्याही साथीच्या रोगापेक्षा अपघाताचा रोग हा भस्मासूर आहे. आपल्याकडे अनेक जण वाहन चालवताना मोबाईलवर बोलतात अशी तीव्र नाराजी त्यांनी व्यक्त केली. ठाणे पोलीस आयुक्तलयांतर्गत गेल्यावर्षी १२,२०० तर यावर्षी २९००० विद्यार्थ्यांना सजग करण्याचा प्रयत्न केला आहे अशी माहिती कराळे यांनी दिली. याप्रसंगी वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड, ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश भंगुरे, ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बल्लाळ आणि इतर विभागीय आयुक्त व अधिकारी उपस्थित होते. प्रेझेंटेशननंतर विद्यार्थ्यांनी पोलीस अधिकाऱ्यांशी मनमोकळेपणाने संवाद साधला.