प्रसिद्ध व्हायला जाऊ नका कारण यश मिळवणे सोपे असले तरी ते टिकवणे कठिण - तेजश्री प्रधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2020 05:25 PM2020-01-16T17:25:12+5:302020-01-16T17:43:52+5:30
कै. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे शेवटचे पुष्प अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी गुंफले.
ठाणे : शाश्वत हे तुमचे शिक्षण आणि ज्ञान असते. चेहरा हा दहा वर्षांनंतर नसणारे. तुमचे सौंदर्य हे अंतरंगातून येऊ दे यासाठी प्रयत्न केला पाहिजे. कलेला भाषेचे बंधन नाही. प्रत्येक कला ही त्या भाषेला आणि भाषेच्या प्रत्येक संस्काराला अनुसरून व्यक्त केली जाते. प्रसिद्ध व्हायला जाऊ नका कारण यश मिळवणे सोपे असले तरी ते टिकवणे कठिण असते असा सल्ला अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी तरुणांना दिला.
कै. रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेचे सातवे पुष्प बुधवारी अभिनेत्री तेजश्री प्रधान यांनी गुंफले. आमची पिढी छोटे मोठे आनंद खुप मिस करीत असते. त्यापैकी मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध. हा सुगंध तुम्हाला महागड्या पुष्पगुच्छामध्ये नाही मिळणार असे सांगताना त्या म्हणाल्या की, त्यांनी आपल्या दिनचर्याबद्दल सांगितले. मी अभिनेत्री नसते तर समिक्षक, समुपदेशक किंवा मोटिव्हेनल स्पीकर असते. मी कधीही अति आत्मविश्वासाने जगले नाही. सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमात पहिल्यांदा अँकरिंग करताना आलेले अनुभव त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी स्वत:चे विचार मांडणे आणि लेखकाच्या डोक्यातील विचार मांडणे यात खुप फरक आहे. त्यामुळे मला अभिनयापेक्षा निवेदन कठिण असल्याचे त्या म्हणाल्या. आज आम्ही मोठ्या गाड्यांत फिरतो, महागडे कपडे घालतो, महागडे कानातले घालतो हे सर्वांना दिसते. पण जे दिसते तसे नसते. आम्ही इथपर्यंत पोहोचण्यासाठी खुप मोठा संघर्ष केलेला असतो. शुटिंगसाठी मी डोंबिवली ते अंधेरी प्रवास करायची तेव्हा स्वत:सोबत नेहमी एक पुस्तक ठेवायचे. एका लेखकाची साथ मला असायची. आज वाचनामुळेच मी इथपर्यंत पोहोचले आहे. तुमचे बाह्यसौंदर्यापेक्षा आतील सौंदर्य चांगले असणे गरजेचे आहे. यावेळी आपल्या सामाजिक कार्याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या की, आज खुप मुलांना जगात मनापासून शिक्षण घेण्याची इच्छा असते, आपल्या मिळकतीतला खारीचा वाटा त्यांच्या शिक्षणासाठी उचलण्याचे काम मी करीत आहे असेही त्या म्हणाल्या. सुरूवातीला आ. संजय केळकर, आ. निरंजन डावखरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर समितीचे सचिव शरद पुरोहीत यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी नंदिनी गोरे यांनी त्यांची मुलाखत घएऊन त्यांना बोलते केले.