वडवली पूल तयार असताना जनतेला वेठीस धरू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:41 AM2021-03-27T04:41:27+5:302021-03-27T04:41:27+5:30
कल्याण : आंबिवली-शहाड रेल्वे स्थानकादरम्यान वडवली रेल्वे उड्डाणपूल बांधून तयार आहे. मात्र, राजकीय श्रेय वादामुळे हा पूल वाहतुकीसाठी खुला ...
कल्याण : आंबिवली-शहाड रेल्वे स्थानकादरम्यान वडवली रेल्वे उड्डाणपूल बांधून तयार आहे. मात्र, राजकीय श्रेय वादामुळे हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जात नाही. पूल तयार असताना जनतेला वेठीस धरण्यात काय अर्थ आहे, असा सवाल भाजप सचिव सुशीलकुमार पायाळ यांनी केला आहे.
अकरा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर विविध अडचणींवर मात करीत वडवली रेल्वे उड्डाणपूल बांधून तयार झाला. या पुलाचे लोकार्पण पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार होते. काही कारणास्तव हे लोकार्पण रद्द करण्यात आले. त्याचवेळी मनसेने हा पूल खुला करत पुलाचे लोकार्पण केले. पुलावरून वाहतूक सुरू झाली होती. हा पूल अधिकृतरित्या खुला केला नसल्याने तो दुसऱ्या दिवशी पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. मनसेच्य़ा बेकायदा लोकार्पणावर शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी टीका केली. पुलाचे लवकर रितसर लोकार्पण केले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, पायाळ यांनी केडीएमसी आयुक्तांना पत्र देऊन राजकीय श्रेयासाठी जनतेला वेठीस धरू नका. पूल तयार झाला असल्याने तो वाहतुकीस खुला करावा. लोकार्पणाची वाट पाहू नये. जनतेने दिलेल्या कररूपी पैशांतून हा पूल उभाराला. त्याच्या वापरासाठी जनतेला प्रतीक्षा करावी लागू नये, याकडे पायाळ यांनी लक्ष वेधले आहे.
-------------------