'शहरातील खड्ड्यांचा त्रास मलाही झाला'; उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली उघड नाराजी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2020 05:28 PM2020-08-24T17:28:00+5:302020-08-24T17:35:36+5:30
ठाण्यात खड्ड्यांवर राजकीय वादंग सुरू असून विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेनेला टार्गेट केले आहे.
ठाणे: ठाण्यात ठिकठिकाणी पडलेल्या खड्डयांबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली असून हे खड्डे त्वरीत भरावे असे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. ठाण्याला येताना रस्त्यावर खड्डे असल्याचे लक्षात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी लक्षात आणून दिले. खड्ड्यांकडे दुर्लक्ष करू नका असा इशारा देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्नी उद्धव ठाकरे यांनी ठाणे, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महापालिका करत असलेल्या कोरोना उपाय योजनांचा आढावा ठाणे पालिका मुख्यालयाच्या नरेंद्र बल्लाळ सभागृहात घेतला. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि तीनही महापालिकांचे आयुक्त आणि सर्व प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
ठाण्यात खड्ड्यांवर राजकीय वादंग सुरू असून विरोधकांनी या मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेनेला टार्गेट केले आहे. प्रशासनामुळे सत्ताधारी बदनाम होत असल्याचा आरोप देखील यापूर्वी महापौर नरेश म्हस्के यांनी केला होता. आता यानंतर पालिका त्यामुळे मुखयमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत:च ठाण्यातील खड्ड्यांच्या संदर्भात प्रशासनाला धारेवर धरून विरोधकांना अप्रत्यक्षपणे प्रत्युत्तर दिले आहे. सर्वात आधी त्यांनी ठाणो महापालिकेचा आढावा सर्व पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडून माहिती घेतली तसेच इतर अधिकाऱ्यांची मते जाणून घेतली. ठाण्याच्या पारिस्थितीवर त्यांनी समाधान व्यक्त केले असून निधीची कमतरता पडू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, शहरातील खड्ड्यांचा त्रास आपल्यालाही झाला असून, त्याबाबत त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. खड्डे तत्काळ बुजविले जावेत, आणि नागरीकांची खड्ड्यातून मुक्तता करावी असे आदेशही त्यांनी यावेळी दिले. या बैठकीला नगरविकास मंत्री तथा पालकमंत्नी एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे,गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, आरोग्य प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, सर्व मनपा आयुक्त, खा. श्रीकांत शिंदे, आ. संजय केळकर, निरंजन डावखरे, प्रताप सरनाईक उपस्थित होते .