रायगड अंधारात ठेऊ नका, खासदार शिंदेच्या भेटीनंतर विद्युत रोषणाईने उजळला गड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2021 09:08 PM2021-02-18T21:08:11+5:302021-02-18T21:09:24+5:30
डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मागणीचे पत्र पुरातत्व विभागाला दिले. या मागणीवर पुरातत्व विभागाने तातडीने मंजुरी दिली. त्यानुसार शिवजयंतीला किल्ले रायगडावरील वास्तू नेत्रदीपक रोषणाईने उजळणार आहे.
कल्याण : छत्रपती शिवरायांच्या 391 व्या जयंतीनिमित्त राजधानी किल्ले रायगडवर नेत्रदीपक रोषणाई करण्यात येणार आहे. राज सदरसह रायगडवरील विविध वास्तू उजळणार आहेत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी किल्ले रायगडला भेट दिली होती. यावेळी किल्ल्यावरील महत्वपूर्ण वास्तू, छत्रपती शिवरायांची मूर्ती अंधारात असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी तातडीने त्यांनी पुरातत्व विभागाचे राजेंद्र यादव यांच्याशी मोबाइलवरून संपर्क साधला. रायगडावर विद्युत रोषणाईची व्यवस्था करण्यासाठी मागणी केली. मात्र, विद्युत रोषणाई करण्यासाठी आवश्यक फंड नसल्याचे यादव यांनी सांगितले. त्यावेळी श्रीकांत शिंदे यांनी जोही फंड लागेल मी देतो, मात्र रायगड अंधारात ठेवू नका अशा सूचना केल्या.
डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मागणीचे पत्र पुरातत्व विभागाला दिले. या मागणीवर पुरातत्व विभागाने तातडीने मंजुरी दिली. त्यानुसार शिवजयंतीला किल्ले रायगडावरील वास्तू नेत्रदीपक रोषणाईने उजळणार आहे. यापुढे किल्ले रायगड अंधारात राहणार नाही, असे अभिवचन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पुरातत्त्व विभागाने दिले. तसेच, छत्रपती शिवरायांच्या 391 व्या जयंतीनिमित्ताने राजधानी किल्ले रायगड 18 व 19 फेब्रुवारी रोजी शिवभक्तांसाठी 48 तास खुला राहणार आहे. यासाठी शिवभक्तांना कोणतेही प्रवेश शुल्क आकारले जाणार नाही.खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी रायगड किल्ल्याला भेट दिली. त्यावेळी त्यांनी शिवजयंतीच्या निमित्ताने रायगडवर ज्योत नेण्यासाठी तसेच शिवरायांच्या दर्शनासाठी येणार्या शिवभक्तांना कोणत्याही प्रकारचे शुल्क न आकारता त्यांना प्रवेश मिळावा, तसेच 18 व 19 फेब्रुवारी असे दोन दिवस 48 तास पूर्णवेळ रायगड सुरू रहावा, अशी मागणी डॉ. शिंदे यांनी सांस्कृतिक तथा पर्यटन राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल व केंद्रीय पुरातत्त्व विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या मागणीला बुधवारी सायंकाळी सहा वाजता मान्यता देण्यात आली. केंद्रीय पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. अरविंद मंजुळ यांनी ही मान्यता दिली आहे. पुरातत्त्व विभागाचे अधिक्षक राजेंद्र यादव यांना मागणीचे पत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे प्रतिनिधी म्हणून स्वीय सहायक मंगेश चिवटे यांनी मंगळवारी दिले होते. या मागणीला 24 तासांतच परवानगी मिळाली.
रायगडावर रोज पुष्पहार अर्पण
छत्रपती शिवरायांची राजधानी किल्ले रायगडवरील राजसदर व होळीचा माळ येथील शिवरायांचा पुतळा आणि समाधी स्थळाला रोज पुष्पहार अर्पण करण्याचा संकल्प खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केला आहे. संकल्प उद्या शिवजयंतीच्या माध्यमातून सुरू होईल.